चित्रकार चंद्रशेखर राऊत जोपासताहेत २० वर्षांची परंपरा
नागपूर : गणपतीचे आगमन होणार म्हटले की घरोघरी आनंदाचे वातावरण असते. दहा दिवस मोठ्या हर्ष उल्हासात पार पाडतात. श्रद्धापूर्वक पूजाविधी केली जातो. पण समाजातील काही व्यक्ती अशा उत्सवांकडे सामाजिक दृष्टिकोनातून बघतात. खरबी येथील रहिवासी चंद्रशेखर राऊत हे त्यापैकीच एक. चित्रकार असलेल्या राऊत यांच्याकडे ५५ वर्षांपासून गणपतीची स्थापना केली जाते. यावर्षी त्यांनी गणेश उत्सवाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
राऊत हे आपल्या कलेद्वारे सन १९९० पासून विविध विषयावर देखावे बनवून दरवर्षी समाजाला संदेश देत असतात. पहिल्यांदा त्यांनी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून समाजाचे रक्षण केले हे दाखवले. त्यानंतर प्रत्येक वर्षी विविध विषयावर देखावे बनविले. यामध्ये बेटी बचाव, कारगिल विजय, भारताच्या स्वातंत्र्याची ६० वर्षे, शिवरायांचे जीवनचरित्र, आई, पर्यावरण आदी विषयांचा समावेश आहे.
यावर्षी कोरोनाच्या भीषण संकटातही राऊत यांनी आपली परंपरा कायम ठेवली. एकीकडे भारत कोरोनाच्या संकटाला पुर्ण शक्तीनिशी तोंड देत आहे आणि दुसरीकडे चीन देशावर भ्याड हल्ले करत आहे हे त्यांनी देखाव्यातून साकारले आहे.
भारताचे स्वतंत्र सेनानी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन भारतीय सेना पुर्ण ताकदीनिशी चीनचा सामना करत आहे; सोबतच सामान्य नागरिकांनीही चिनी वस्तूंचा बहिष्कार करून स्वदेशीचाच स्वीकार करण्याचा संदेश देण्यात आला आहे. प्राचीनकाळापासून आयुर्वेदाची आपली परंपरा आहे, त्याचाही आपण स्वीकार करावा हेही त्यांनी देखाव्यातून प्रदर्शित केले आहे. या सामाजिक उपक्रमात त्यांचा मुलगा आर्यन, मुलगी भक्ती, पत्नी, आई व संपूर्ण परिवाराचे त्यांना सहकार्य लाभले आहे.