स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन
नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, त्याचप्रमाणे नुकताच गणतंत्र दिवसही पार पडला ह्याचेच औचित्य साधून महा मेट्रोच्या नागपूर मधील कार्यालयात मेट्रो भवन येथे ‘देशभक्तीपर गीतांचा आणि कवितेचा’ कार्यक्रम मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लेखक, पत्रकार आणि सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश एदलाबादकर, संस्कार भरतीचे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते आशुतोष अडोणी, सुप्रसिद्ध व्यंगकवी अनिल मालोकर आणि विसासंघाच्या ग्रंथसहवासचे व्यवस्थापक दिलीप म्हैसाळकर उपस्थित होते. याशिवाय कार्यक्रमाला विशेषत्वाने सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ह्यांनी उपस्थिती दर्शविली.
शहरभरातुन नामवंत कवी आणि गायक ह्यांनी या कार्यक्रमात स्वरचित कवितांचे अभिवाचन केले तसेच काहींनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. मंजुषा अनिल, सर्वेश फडणवीस, अपर्णा विचोरे, चित्रा कहाते, रजनी सातपूते, अभिषेक बेल्लरवार, सुरुची डबीर, मिनल येवले, अनुराधा हवालदार, ज्योत्सना साने, अभीजित खोडके, आनंद देशपांडे ह्यांनी सादरीकरण केले. यावेळी प्रा. एदलाबादकर ह्यांनी त्यांच्या नागपुरातील आठवणी ताज्या केल्या, ते म्हणाले १९४७ पासून नागपुरात होणारे विकासात्मक बदल ते पाहत आले आहेत..
एकेकाळी अगदी रिक्षा-ऑटो देखील नसणाऱ्या याच शहरात मी सार्वजनिक परिवहनाच्या मेट्रो धावताना पाहतो आहे. नागपूर मेट्रोने नागपूरला एक ओळख मिळवून दिले असल्याचे यावेळी ते म्हणाले. आशुतोष अदोनी ह्यांनी देखील देशभक्तीपर गीतांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन नागपूर मेट्रोने केले त्याबद्दल अभिनंदन दिले आणि ज्याप्रमाणे मेट्रो शहराच्या एका कोणापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत धावते आहे त्याप्रमाणे अश्या कार्यक्रमाच्या माध्यमाने महा मेट्रो प्रशासनाने साधारण लोकांच्या मनापर्यंत पोचण्याचा मार्ग बनवला आहे असे ते याप्रसंगी म्हणाले. अनिल मालोकार ह्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत कविता वाचून उपस्थितांचे मनोरंजन केले.कार्यक्रमाला महा मेट्रोचे कार्यकारी व्यवस्थापक (प्रशासन) श्री अनिलकुमार कोकाटे तसेच कार्यकारी व्यवस्थापक (ऑपरेशन & मेंटेनन्स) उदय बोरवणकर उपस्थित होते