नागपूर: तथागत गौतम बुद्धाला ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले, त्या वृक्षाचा वारसा पवित्र दीक्षाभूमीत आहे. हे वृक्ष तथागतांच्या ज्ञानप्राप्तीचे साक्षीदार आहे. या प्रेरणाभूमीतूनच तथागताच्या शांती, करुणा आणि मैत्रीचा संदेश जगभरात पसरतोय, असे प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व्यक्त केले.
बुद्ध जयंतीनिमित्त पवित्र दीक्षाभूमी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ससाई व स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यानंतर जयभीमचा जयघोष करण्यात आला. बोधिवृक्षाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने बोधिवृक्ष परिसरात बुद्धवंदना घेण्यात आली. यानंतर स्तुपाच्या आत अस्थीचे दर्शन घेतल्यानंतर ससार्इंनी उपस्थितांना प्रवचन दिले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ साली आपल्या लाखो बांधवांसह बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आज हे पवित्र स्थान जगभरातील बौद्धांचे प्रेरणास्थान बनले आहे. याच दीक्षाभूमीवर श्रीलंकेहून आणलेल्या बोधिवृक्षाच्या रोपट्याचे वैशाख पोर्णिमेला म्हणजे १२ मे १९६८ रोजी दीक्षाभूमीवर रोपण करण्यात आले होते. या रोपट्याचे आज बोधिवृक्षात रूपांतर झाले. या वृक्षाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. येथे येणारे अनुयायी बोधिवृक्षाच्या छायेत बसतात.
याप्रसंगी स्मारक समितीचे सदस्य आर.एन. सुटे, विलास गजघाटे, आनंद फुलझेले, सुधीर फुलझेले, प्राचार्य पवार यांच्यासह भंते नागसेन, भंते नागानंद, नागाप्रकाश, भीमाबोधी, धम्मउदय, धम्मबोधी, महानाग, धम्मदीप, संघप्रिया, संघशिला, रवी मेंढे, नन्हा सवाईथूल, संजय मेश्राम, अविनाश सवईथूल, सपन खोब्रागडे, मिलिंद टेंभुर्णीकर, नीलेश लोखंडे, नवीन वाघमारे, नितीन फुलमाळी, दिनेश चंद्रिकापुरे, अमन रामटेके, हर्षल वासनिक, निशांत गायकवाड, उपासक-उपासिक उपस्थित होते. बुद्धवंदनेनंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.