नागपूर : वातावरणातील धोकादायक बदल थांबविण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड मोहिमेत लोकसहभाग गरजेचा आहे. वृक्ष लागवड फक्त शासकीय कार्यक्रम नाही तर त्यासोबतच ती सामूहिक जबाबदारी असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम, वने, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व चॅरीटी बार असोशीएशनच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिणीता फुके, सहआयुक्त आभा कोल्हे, धर्मादाय उपायुक्त ममता रेहपांडे, सहायक आयुक्त मा.रा. जाधव, प्रणाली पाटील, चॅरीटी बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. आनंद गोडे, ॲड. गणेश अभ्यंकर, ॲड. राहुल बाभुळकर यांच्यासह स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी, वकील व नागरिक उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड ही विनाशास कारणीभूत ठरत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व संवर्धन हाच उपाय आहे. धर्मादाय आयुक्त व वकील संघटनानी वृक्षलागवडीत सहभागी व्हावे. अंबाझरी तलाव परिसरात अठराशे एकर परिसरात केलेल्या वृक्षलागवडीतून हिरवेगार जंगल उभे करण्यात आलेल्या उपक्रमाची माहीती त्यांनी दिली. धर्मदाय आयुक्त कार्यालयातील प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी ॲड. आनंद गोडे यांनी गेल्या वर्षी केलेल्या वृक्षलागवड मोहिमेतील वृक्षांची चांगल्या पद्धतीने वाढ होत असल्याचे सांगितले. यावेळी धर्मदाय संघटनाच्या प्रतिनिधींना तुळशी रोपे वाटण्यात आली.
प्रास्ताविक सहआयुक्त आभा कोल्हे यांनी केले. संचलन प्राजक्ता कठाडे तर आभार ममता रेहपांडे यांनी मानले.