नागपूर : नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी रात्रीच्या वेळी शहरात फिरून बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा छडा लावला. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून 3 लाख 70 रुपयांचा मालही जप्त करण्यात आला आहे.
प्रताप नगर पोलीस ठाण्यांतर्गत जयताळा रोडवर असलेल्या भाऊसाहेब सुर्वे येथे राहणारे अजय वायगावकर यांची मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
याबाबत त्यांनी प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. पेट्रोलिंग दरम्यान चारही आरोपी दोन दुचाकीवरून जात असताना पोलिसांना संशयास्पद वाटले असता त्यांच्याकडे असलेली दोन्ही वाहने चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने शहरातील अजनी, सोनेगाव व बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत चार चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 3,70,000 रुपयांचा चोरीचा मालही जप्त केला आहे.
यापूर्वीही त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आदित्य रहांगडाले, करण बुलकुंडे, कुणाल शर्मा आणि सुजल ढाले यांचा समावेश आहे.