मुंबई: पाकिस्तानातील पंजाब प्रांताने नुकतीच एक महत्वाची बैठक घेवून शहीद भगतसिंग हे स्वातंत्र्यसंग्रामातील महानायक असून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांसाठी एक महान व्यक्तीमत्व आहे असे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. पाकिस्तान सरकार आता स्वातंत्र्यसेनानी शहीद भगतसिंग यांच्यासंदर्भातील एक मोठं प्रदर्शन लाहोरला भरवत आहे. त्या प्रदर्शनामध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यासंदर्भातील जे-जे ब्रिटीशांचे दस्ताऐवज आहेत ते जनतेसाठी पाकिस्तानमध्ये खुले करणार आहेत अशी माहिती आमदार हेमंत टकले यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहात मांडली.
आपल्या राज्यातील गोष्टीशी आहे असं काही नाही. परंतु आपल्या शेजारचं राष्ट्र पाकिस्तान आणि त्यातील पंजाब प्रांत… आज स्वातंत्र्यानंतर दोन वेगळे देश निर्माण झाले असले तरी त्यांनी मान्य केले आहे की, शहीद भगतसिंग यांचे सहकारी दोन्ही देशामध्ये महत्वाचे आहेत. त्याचबरोबर शहीद भगतसिंग यांची पुस्तके पंजाब ट्रॅजेडी, जखमी पंजाब, गंगादास डाकू, सुलताना डाकू या तीन-तीन चळवळींचा इतिहास हे मौलिक ग्रंथही पाकिस्तानात प्रदर्शित केले जाणार आहेत.
शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांविषयी असलेली सदभावना पाकिस्तानमधून व्यक्त होतेय ती एक वेगळी आणि औचित्यपूर्ण घटना आहे म्हणून त्याची नोंद सभागृहात व्हावी असे आमदार हेमंत टकले यांनी सांगितले.
त्याचबरोबर दरवर्षी शहीद दिनी सरकारतर्फ त्यांना वंदन करणारी जाहिरात केली जाते ती यावर्षी दिली गेली नाही याबद्दल आमदार हेमंत टकले यांनी खेद व्यक्त केला.