Published On : Fri, Sep 27th, 2019

दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध करुन देणार- जिल्हाधिकारी

Advertisement

नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पीडब्ल्यूडी (People With Disabilities) ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या ॲपमध्ये दिव्यांग मतदारांनी नोंदणी केल्यास त्यांना मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार. तसेच दिव्यांगांना मतदान करताना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विविध दिव्यांग स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, प्रा. विनोद आसुदानी, समाज कल्याणच्या सुकेशिनी तेलगोटे, अपंग असोशिएशनचे रणजित जोशी, संजय ककीर, ऑरेंज सिटी डेफ असोशिएशनचे रवि रक्षेल, यांच्यासह विविध दिव्यांग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यांगाने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असल्यास त्याने ॲड्रॉईड मोबाईलवर पीडब्ल्यूडी ॲप डाऊनलोड करावे. अगदी सोप्या पद्धतीने दिव्यांगत्वाची माहिती द्यावी. यासाठी दिव्यांगांना निवडणूक विभागाने दिलेला त्यांचा इपिक क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी वाहनासोबत व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. नागपूर लोकसभा निवडणुकीत 54 टक्के मतदान झाले होते. मात्र त्यात दिव्यांग मतदारांची टक्केवारी ही 56 टक्के होती, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

नागपूर‍ जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 490 दिव्यांगानी या ॲपमध्ये नोंदणी केली आहे. दिव्यांगांमध्ये जनजागृती करुन त्यांना ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी विविध दिव्यांग स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा व्हॉटस ॲप ग्रूप बनवून दिव्यांगांपर्यंत पोहचण्याचा निवडणूक विभागाचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी 700 जणांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्‍यांनी सांगितले.

विविध मतदान केंद्रामध्ये रेलींग लावणे, कर्णबधीरांसाठी सांकेतिक भाषा, माहिती पत्रके, सुविधादर्शक चिन्हे, रॅम्प लावणे, ब्रेल लिपी न येणारांसाठी मतदान केंद्रात मदतनीसाची मदत घेता येणार आहे. सर्वाधिक दिव्यांग असलेल्या मतदान केंद्रांमध्ये त्यांच्या मागणीनुसार सुविधा उपलब्ध करुन देण्यावर निवडणूक विभागाचा भर राहणार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी दिव्यांगांचा विधानसभा निवडणुकीत सहभाग वाढविण्यासाठी व्हीडीओ क्लीप बनवून विविध व्हॉट्स ॲप ग्रूपवर शेअर करण्यात येईल, असे प्रा. विनोद आसुदानी यांनी सांगितले. यावेळी नोडल अधिकारी अभिजित राऊत यांनी उपस्थितांसमोर सादरीकरण केले.

पीडब्ल्यूडी ॲप
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी खास तयार केलेले ॲप असून, हे गूगल प्ले वरुन ॲड्रॉईड मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे. या ॲपला मोबाईलची केवळ 6.2 एमबी जागा लागते. ॲप डाऊनलोड केल्यास इंग्रजी आणि हिंदी भाषेत माहिती भरण्याचा पर्याय आहे. त्यानंतर मोबाईल नंबर नोंदवावा. त्यावर ओटीपी येणार असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदाराला व्हीलचेअर उपलब्ध करून देणे, दिव्यांगाला त्याची विशेष नोंद (मार्क) करता येणे, तसेच त्याचे जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून स्थान नोंदवता येणार आहे. मतदानाच्या दिवशी त्याच्या मागणीनुसार सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

Advertisement
Advertisement