नागपूर :वित्त मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल वरील मुल्यवर्धित कर नागपूर वगळता राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला जरी दिलासा मिळाला असला तरी पेट्रोल-डिझेल दराच्या बाबतीत नागपुरवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे.मात्र महाराष्ट्रात इंधनाचे दर नागपुरात सर्वाधिक आहेत.तरी देखील सरकारने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात पेट्रोल-डिझेलचा दर बऱ्यापैकी कमी केले.
नागपुरात हे दर का कमी करण्यात आले नाही? सरकारने नागपूर शहरात सावत्र आईची वागणूक का दिली, असा संतप्त सवाल काँग्रेस नेते तसेच पक्षाचे सोशल मीडिया सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेमुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.मात्र नागपुरात हे दर कमी का करण्यात आले नाही ?असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.