मुंबई : नागपूर हे शहर भौगोलिकदृष्ट्या वाहतुकीसाठी सोयीचे आहे. नागपूर मध्ये मिहान आणि इतर परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. इथल्या पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने व उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने औषध निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली संधी आहे, त्यांनी नागपुरात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या औषध निर्माण क्षेत्रातील गुंतवणूक संधी या विषयावरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर हे देशातील महत्वाचे औद्योगिक शहर म्हणून विकसित होत आहे. इथे उद्योग उभारणीसाठी आवश्यक जागा, पाणी आणि वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नागपूरला फार्मा हब बनविण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि सुविधा उपल्ब्ध करून देण्यात येतील. निर्मितीसह निर्यातीतील वाटा उचलण्यासाठीही नागपूर शहर सज्ज आहे. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक यांच्यासह नागपूर जवळील ड्राय पोर्टचा उपयोग करुन देशांतर्गत आणि देशाबाहेर औषधी पुरविणे सुलभ होणार आहे. या भागात असलेल्या फार्मास्युटिकल महाविद्यालयातून दर्जेदार उत्पादनासाठी लागणारे मनुष्यबळदेखील मुबलक उपलब्ध होणार आहे. औषध निर्माण क्षेत्रातील उद्योजकांसाठी मिहान मध्ये जागा राखीव ठेवण्यात येणार असून येत्या सहा महिन्यात यातील जास्तीत जास्त उद्योगांना इथे उभे राहण्यास मदत करण्यात येईल.
यावेळी बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे सुमारे 54 हजार कोटी रुपयांचे विकास कामे सुरु असल्याचे सांगितले. ते म्हणाले, नागपूर येथे रस्त्यांचे जाळे व्यवस्थित आहे. त्या शिवाय मेट्रो, समृद्धी महामार्ग यामुळे नागपूरचे महत्त्व वाढणार आहे. भंडारा, सावनेर व इतर जवळपासच्या भागांना ब्रॉडगेज मेट्रोने जोडण्यात येणार आहे. आता वर्धा-नागपूर प्रवासासाठी लागणारा एक तासाचा वेळ कमी होऊन केवळ 35 मिनिटात हे अंतर कापता येणार अहे. नागपूर वरुन रोज सुमारे 350 विमाने उडतात. आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रात्री परदेशात जाणाऱ्या विमानातून दोहा, दुबई, अबुधाबी येथे फळे, भाज्या निर्यात केल्या जातात. यापुढे मदर डेअरीची उत्पादने पाठविण्यास सुरुवात करणार आहे. नागपूर येथे उद्योग उभारल्यास आपत्कालीन परिस्थितीत लागणारी औषधांची निर्यात करणे कमी खर्चात होऊ शकेल.