नागपूर : छत्तीसगडमधून गांजाची मोठी खेप घेऊन नागपुरात येताना पोलिसांनी जेरबंद केलेल्या तस्करांपैकी एकाच्या घरातून पोलिसांनी पिस्तुल तसेच चार जिवंत काडतूस जप्त केले. राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड (वय ३२, रा. सतनामीनगर) असे पिस्तुल जप्त करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी आणि सोमवारी सलग धाडसी कारवाई करीत गांजा तस्कर राजेंद्र ऊर्फ लड्डू किराड, नितीन कृष्णाजी मोहाडीकर (वय ३५, रा. भवानीनगर न्यू शारदा चौक, कळमना), स्वप्निल सुरेश तोडसाम (वय ३०, रा. आराधनानगर खरबी), महेंद्र केशवराव वाडनकर (वय ३२, रा. सतनामीनगर, लकडगंज) आणि अनिल विष्णुप्रसाद विश्वकर्मा (वय १९, रा. भवानीनगर, कळमना) तसेच शेख सादिक शेख बाबा (वय ३३), शेख अरमान शेख उमर (वय २१) आणि शेख राजिक ऊर्फ गोलू शेख बाबा (वय २२) या आठ तस्करांना जेरबंद केले.
त्यांच्याकडून एकूण ४०० किलो गांजा, पाच वाहने तसेच आठ मोबाईलसह ७२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सोमवारी रात्री पोलिसांनी लड्डू किराड याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी ते जप्त केले. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी सात दिवसांची कस्टडी मिळवली.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम तसेच सहायक आयुक्त संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहायक निरीक्षक दिलीप चंदन, स्वप्निल वाघ, एएसआय अर्जुन सिंग, विठोबा काळे, हवालदार दत्ता बागुल, विनोद मेश्राम, नायक तुलसी शुक्ला, सतीश पाटील, शिपाई नितीन साळुंखे, नरेश शिंगणे, कुंदा जांभुळकर, रुबिना शेख त्याचप्रमाणे सायबर सेलचे सूरज भोंगाडे, सुहास शिंगणे, आशिष पाटील आणि नितीन वानखेडे आदींनी ही कामगिरी बजावली.