नागपूर: निर्माणाधीन असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कार्याला गती देवून 31 मार्चपर्यंत येथील कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा श्री. राऊत यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी निर्माणाधीन प्रशासकीय तसेच शैक्षणिक इमारत, ग्रंथालय, मुला-मुलींचे वसतिगृह यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंदर कुमार, विशेष कर्तव्य अधिकारी प्रा. चामर्ती रमेश कुमार, कुलसचिव आशिष दिक्षीत, सहाय्यक कुलसचिव प्रा. सोपान शिंदे, डॉ. रंगास्वामी स्टॅलिन, विद्यापीठाचे सल्लागार वास्तूशास्त्रज्ञ परमजित अहुजा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, प्रफुल्ल लांडे, मनिष पाटील, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपुरे, संपर्क अधिकारी रमेश मानापुरे आदी यावेळी उपस्थित होते.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विधी विद्यापीठाच्या विद्युत पुरवठ्यासंबंधित निविदाविषयक कामे तातडीने हाती घ्यावे. तसेच येथील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण 10 एप्रिल रोजी करण्याचे नियोजन आहे. याबाबत समन्वय समिती गठित करून प्रत्येक कामाचे जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाच्या प्रगतीचा दर आठवड्याला आढावा घेवून यासंबंधी अहवाल संबंधितांना पाठवावा, असे निर्देश श्री. राऊत यांनी यावेळी दिले.
पुढील महिन्यातील धुलिवंदन सण लक्षात घेता प्रगतीपथावरील कामावर परिणाम होवू नये, यासाठी कामगार व्यवस्थापन करण्याचे सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विद्यापीठाच्या बांधकामाची सर्व कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करून प्रकल्प निधीच्या तरतूदीसाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करावा. पुढील महिन्यात 6 मार्चला येथील प्रगतीपथावरील कामे तसेच परिसराचे सौंदर्यीकरण याबाबत पाहणी करून आढावा बैठक घेण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.