सर्व नगरसेवकांनी केला नासुप्र चा विरोध
नागपूर: नागपूर शहराच्या विकासासाठी शहरात एकच नियोजन प्राधिकरण हवे. शासन निर्णयानुसार नागपूर सुधार प्रन्यासचे गुंठेवारीसह सर्व अभिन्यास नागपूर महानगरपालिकेकडे सुपूर्द करणे. नागपूर सुधार प्रन्यासमधील अतिरिक्त झालेले कर्मचारी, अधिकारी मनपामध्ये रूजू करावे, नासुप्र कडून अधिकारी रूजू न होत असल्यास मनपाला कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार राज्य शासनाने द्यावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी सभागृहात प्रशासनाला दिले.
सभागृहात एकूण ३४ नगरसेवकांनी चर्चेत सहभागी होऊन नागपूर सुधार प्रन्यासचा विरोध केला. याचा अहवालही राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा. गुंठेवारी प्रकरणी विशेष सेल गठीत करण्यात यावे. २९ फेब्रुवारी पर्यंत या सेलची स्थापना करण्यात यावी. नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींसोबत माजी ट्रस्टी, सर्व ज्येष्ठ नगरसेवक व पक्ष नेत्यांची बैठक घेण्यात यावी, असेही निर्देश महापौरांनी सभागृहात दिले.