Published On : Fri, May 19th, 2017

जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीक पध्दतीचे नियोजन आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement
  • दारासमोर रांगोळ्या काढून, गुढ्या उभारून ग्रामस्थांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत.
  • फेटेधारी मुलींनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत.
  • हात उंचावून ‘एक-दोन-तीन – फुले-फुले-फुले’ चा गजर करत मुख्यमंत्र्यांना ग्रामस्थांचे अभिवादन.
  • ग्रामस्थांसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद, कामांची घेतली माहिती.
  • स्वतः श्रमदान करून मुख्यमंत्र्यांनी केले श्रम जागराचे कौतुक.
  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने ग्रामस्थ भारावले.


पुणे/सातारा:
जलसंधारणात किरकसाल गावाचे काम आदर्शवत असून तो एक माईलस्टान आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीक पध्दतीचे नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

किरकसाल ता. माण येथील जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. यावेळी राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयकुमार गोरे, पृथ्वीराजबाबा देशमुख, डॉ. दिलीप येळेगावकर, पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माण-खटावचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, सरपंच अमोल काटकर, उपसरपंच शितल कुंभार उपस्थित होत्या.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुष्काळ हा निसर्गाबरोबरच मानवनिर्मित असतो. निसर्गाकडून मिळालेल्या गोष्टींची परतफेड आपण निसर्गाला केली तर तो आपल्याला समृध्द करतो, दुष्काळमुक्त करतो. मात्र निसर्गाला आपण ओरबाडले तर तो आपल्याला दुष्काळ देतो. त्यामुळे जलसंधारणाच्या विविध उपचार पध्दतीने आपण दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. गावाच्या शिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपण अडवला पाहिजे, तो जमिनीत जिरवला पाहिजे. किरकसाल गावाने अत्यंत दर्जेदार पध्दतीने जलसंधारणाचे काम केले आहे. राज्यातील इतर गावांसाठी हे प्रेरणादायी आहे.

Advertisement
Today's Rate
Thursday 12 Dec. 2024
Gold 24 KT 78,500/-
Gold 22 KT 73,000/-
Silver / Kg 94,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गटशेतीला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. शासनाच्या सर्व कृषी योजना शेतकरी गटांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे किरकसाल ग्रामस्थांनी गटशेतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास साधावा. जलसंधारणाच्या कामाबरोबरच गावकऱ्यांनी गावातील पीक पध्दतीतही बदल करणे आवश्यक आहे. अनिर्बंध पाण्याचा वापर टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जलसंधारणाच्या माध्यमातून गावागावांत समृध्दी येणार आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

किरकसाल गावातील सातकीचा मळ्याशेजारील गुरवकीच्या परिसरात सुरु असणाऱ्या सामुहिक श्रमदानाच्या ठिकाणी भेट देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाची पाहणी केली. श्रमदानासाठी जमलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनीही ग्रामस्थांसोबत श्रमदान केले.

किरकसाल गावातील ग्रामस्थांनी गुढ्या उभारून मुख्यमंत्र्यांचे अनोखे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अमोल काटकर यांनी केले. यावेळी किरकसाल गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement