Published On : Wed, Sep 23rd, 2020

प्लाझमा दान आजची गरज; त्यासाठी पुढे या

Advertisement

‘कोव्हिड संवाद’: डॉ.राधा मुंजे व डॉ. अभिजीत अंभईकर यांचे आवाहन

नागपूर : आज संपूर्ण जगच कोरोनावरील लसीची प्रतीक्षा करत आहे. अशात कोव्हिडच्या रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा’ हा अत्यंत महत्वाचा पर्याय आहे. प्लाझमा म्हणजे रक्तातील लाल रक्तपेशी बाहेर काढून उरलेला घटक आहे. कोव्हिडची लक्षणे असून त्यातून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीच्या रक्तामधून प्लाझमा घेतला जातो. त्यासाठी शासनातर्फे कोट्यवधींच्या उपकरांची व्यवस्था करून दिलेली आहे. यासाठी कुणालाही कोव्हिड हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही शासकीय रक्तपेढीमध्ये आवश्यक त्या तपासण्या करूनच प्लाझ्मा घेतला जातो. प्लाझमाच्या उपचारामुळे अनेक कोरोनाबाधित बरे झाल्याचे आकडे उपलब्ध आहेत. मात्र प्लाझमा दानाविषयी आवश्यक त्या प्रमाणात जनजागृती नाही. त्यामुळे अनेक जण प्लाझमा दानासाठी पुढे येत नाही. रक्त दानाप्रमाणेच प्लाझमा दानही श्रेष्ठ दान आहे. आज कोरोनाच्या या संकटात रुग्णांना बरे करण्यासाठी ती आजची गरज आहे. कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना २८ दिवसानंतर केव्हाही प्लाझमा दान करता येतो. त्यामुळे कोव्हिडच्या विळख्यातून बरे होउन परतलेल्यांनी इतरांचाही जीव वाचविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) पल्मनरी मेडिसीन विभागप्रमुख डॉ. राधा मुंजे आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्लाझमा युनीट समन्वयक प्रा. डॉ. अभिजित अंभईकर यांनी केले.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी (ता.२३) ते ‘कोव्हिड आणि प्लाझमा थेरपी’ या विषयावर बोलत होते. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांच्या शंका या सर्वांना त्यांनी समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले.

आपल्या शरीरात रोगाशी लढण्यासाठी जी प्रतिकारशक्ती असते ती प्लाझमा असते. ज्याची चांगली प्रतिकारशक्ती त्याच्या प्लाझमाचा उपयोग केला जातो. प्लाझमा थेरपीमध्ये प्लाझमा दात्याच्या शरीरातून रक्तातील रक्तपेशी काढून त्या दात्याला परत केल्या जातात व त्यातून केवळ प्लाझमा हा घटक घेतला जातो. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये अत्याधुनिक उपकरणाद्वारे ही थेरपी केली जाते. योग्य वेळी योग्य रुग्णाला प्लाझमा देण्यात आल्यास त्याचा फायदा होतो. प्रसूत महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, किडनी विकार असलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना प्लाझमा दिला जात नाही. इतर सर्व रुग्णांना त्याचा उपयोग होउ शकतो. प्लाझमा दिल्याने दात्याची प्रतिकारशक्ती कमी होते हा केवळ गैरसमज आहे. कोव्हिडच्या आजारातून बरा झालेल्या रुग्णाची प्रतिकारशक्ती ही विकसीत होत असते. पुढील ६ महिने प्रतिकारशक्ती कायम असते. त्यामुळे त्याच्या प्रतिकारशक्तीचा उपयोग इतर रुग्णांनाही होउ शकतो, असेही डॉ. राधा मुंजे आणि डॉ. अविनाश अंभईकर म्हणाले.

प्लाझमा दान कोण करू शकतो?
१८ वर्षापेक्षा जास्त आणि ६० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझमा दान करता येतो. मात्र लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना प्लाझमा दान करता येत नाही. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्यांच्या शरीरात आवश्यक त्या प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसते. याशिवाय २ ते ३ अपत्य असलेल्या आईला सुद्धा प्लाझमा दान करता येत नाही. जे रुग्णालयात दाखल होते, ज्यांना जास्त लक्षणे होती व ते पूर्णपणे बरे झाले, अशाच रुग्णांना प्लाझमा दान करता येतो. मात्र या रुग्णांना बरे होउन २८ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. कोरोनामधून मुक्त झाल्यानंतर २८ दिवसांनी ४ महिने रुग्णाला प्लाझमा दान करता येतो.

प्लाझमा दान करण्यापूर्वी दाता सक्षम व सुदृढ आहे अथवा नाही, त्याची संपूर्ण तपासणी केली जाते. अत्यंत सुरक्षित व सोपी पद्धत आहे. यामुळे दात्याला काहीही त्रास होत नाही. प्लाझमा दानाकरिता एक तासापेक्षा जास्त वेळही लागत नाही.

महत्वाचे म्हणजे, प्लाझमा घेउन कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला पुढील ३ महिने रक्तदानही करता येत नाही. त्यामुळे प्लाझमा घेतलेल्या रुग्णांनी याची काळजी घ्यावी, असेही आवाहन दोन्ही डॉक्टरांनी यावेळी केले.

कुठे करता येईल प्लाझमा दान?
प्लाझमा दानाकरिता शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये शासनातर्फे उपकरांची व्यवस्था केली आहे. याशिवाय शहरातील काही खाजगी लॅबमध्येही ती व्यवस्था आहे. यासाठी कोव्हिड हॉस्पिटलमध्येही जाण्याची गरज आहे. शासकीय रक्तपेढीमध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहराबाहेरील कुठल्याही व्यक्तीला प्लाझमा दान करायचे असेल तर त्यांनी त्यांच्या परिसरातील शासकीय रक्तपेढीशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी. आवश्यक त्या तपासण्या करून प्लाझमा घेतला जातो.

शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू लोक उपचार घेत आहेत. अशा रुग्णांना फायदा व्हावा याकरिता शासकीय रक्तपेढीमध्ये प्लाझमा दान करा, असेही आवाहन डॉ. राधा मुंजे आणि डॉ. अविनाश अंभईकर यांनी केले.

Advertisement
Advertisement