नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक बंदी अंतर्गत गुरूवार (ता. ४) व शुक्रवारी (ता. ५) संयुक्तरित्या कारवाई करीत ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला. गुरूवारी (ता. ४) पर्यावरण विभाग व उपद्रव शोध पथकाने महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) येथे आठ तर लक्ष्मीनगर झोनमधील दोन दुकानांवर कारवाई करून एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
पथकाने शुक्रवारी (ता. ५) ही कारवाईचा धडाका कायम ठेवित लक्ष्मीनगर, धंतोली व धरमपेठ झोनमध्ये एकूण सहा ठिकाणी कारवाई करीत ३० हजार रुपये दंड ठोठावला. शुक्रवारी (ता. ५) झालेल्या कारवाईमध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये पथकाने चार ठिकाणी कारवाई करीत २० हजार रुपये दंड आकारला. तर धंतोली व धरमपेठ झोनमध्ये पथकाने प्रत्येकी एक ठिकाणी कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. दोन्ही दिवसाच्या कारवाईमधून २३२ किलो ४९५ ग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले.
२३ जूनपासून शहरात प्लास्टिक बंदी कारवाई सुरू करण्यात आली. तेव्हापासून पर्यावरण विभाग, उपद्रव शोध पथक व झोन स्तरावरील पथकांद्वारे कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. शहराच्या विविध भागांमधील व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांममध्ये कारवाई करीत पथकाचे प्लास्टिक जप्तीचे सत्र सुरू आहे. २३ जूनपासून आजपर्यंत नागपूर शहरात एकूण ३१७ ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये पथकाने १५ लाख १७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. या अंतर्गत पथकाने एकूण ४ टन ७२ किलो ६१० ग्रॅम प्लास्टिक जप्त केले. २३ जूनपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये शुक्रवार (ता. ५) पर्यंत शहरातील विविध भागात एकूण १८ हजार ५३० दुकानांची तपासणी करण्या आली. यापैकी ९४ दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली तर एकावर फौजदारी कारवाई करण्यात आली व ३१७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून १५ लाख १७ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पर्यावरण अधिकारी श्री. मोहरे, श्री. पुसदकर, उपद्रव शोध पथकाचे पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह दहाही झोनचे पथकासह पर्यावरण अधिकारी, उपद्रव शोध पथक असे एकूण ४४ जणांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.