नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर असून, नागपूरमध्ये त्यांचे आगमन झाले आहे. या दरम्यान, पंतप्रधान मोदी रेशम बाग येथील संघाच्या मुख्यालयाला भेट देतील आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या समाधीस्थळावर दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून संवैधानिक पदे भूषवत असताना नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान सकाळी ९:३० वाजता दीक्षाभूमीवर दाखल झाले असून, यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण केली. दरम्यान पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये अत्याधुनिक माधव नेत्रालयाच्या भूमीपुजनाचाही समावेश आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरालाही भेट देणार आहेत.