नवी दिल्ली : पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवलेल्या आरोपीला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. यासंदर्भात न्यायालयाने एका टिप्पणीही केली. १७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीकडे परिपक्वता आणि बौद्धिक क्षमता असते. त्यामुळे संमतीने झालेल्या प्रेमसंबंधांना गुन्हेगारी स्वरुप देणे हा पोक्सोचा हेतू नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
१८ वर्षांखालील मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO ) तयार करण्यात आला.
१७ वर्षे वयाची मुलगी आणि २० वर्षीय तरुण मुलगा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने एफआयआरमध्ये नोंदवला आहे.
घटनेच्या वेळी मुलगी अल्पवयीन होती. परंतु, तिचे वय १७.५ वर्षे होते. या वयात मुलींमध्ये पुरेशी परिपक्वता आणि बौद्धिक क्षमता निर्माण झालेली असते. तर, तरुण २० वर्षीय होता,असेही न्यायालयाने म्हटले.
सध्या आरोपी २३ वर्षांचा असून तो १५ ऑक्टोबर २०२१ पासून कोठडीत होता. त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवल्याने कोणताही उपयुक्त हेतु साध्य होणार नाही. उलट तरुण मुलाला गुन्हेगारांच्या संगतीत ठेवल्याने त्याचे अधिक नुकसान होईल. त्यामुळे कोर्टाने २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.