नागपूर : गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदके घोषित केली. त्यात नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. गणतंत्र दिनाच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या हस्ते अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यामध्ये शाळकरी मुलं, तरुण आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यावर्षीदेखील राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांनाअतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. यात पोलीस आयुक्त सिंगल यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात येणार असल्याने हे नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे.
कोण आहेत डॉ. रविंद्र कुमार सिंगल –
महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस डॉ. रविंद्र कुमार सिंगल हे नागपुरचे पोलिस आयुक्त आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात घेता झालेल्या बदल्यांमध्ये सिंघल यांची नागपुरचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर नागपुरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून बदली केली आहे. रविंद्र कुमार सिंघल 1996 मध्ये भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. 1998 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग एएसपी सांगली शहर विभागात झाली. 1999 मध्ये त्यांची अमरावती शहर डीसीपी म्हणून नियुक्ती झाली. अमरावती येथे तीन वर्षांच्या सेवेनंतर ते नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते.