नागपूर : अकोल्यातील जुन्या शहर भागात दोन गटात मोठा वाद पेटला आहे. एका वादग्रस्त पोस्टवरून झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.या हिंसक घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पावले उचलत शहरात कलम 144 लागू केले. अकोल्यातील जातीय हिंसाचार लक्षात घेऊन नागपुराचे पोलीस कर्मचारी सतर्क झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेत ही पाऊले उचलण्यात आली आहे. सीपी अमितेश कुमार यांनी सांगितले की, समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून तणाव पसरवण्याचे काम करतात. त्यामुळेच व्हायरल होणाऱ्या प्रत्येक मेसेजवर लक्ष ठेवण्याचे आदेश सायबर पोलिसांना देण्यात आले आहेत. जर कोणी खोटी बातमी पसरवत असेल तर त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल.
तहसील, कोतवाली, लकडगंज, यशोधरानगर, कामठी, गिट्टीखदान आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त वाढवली आहे. सर्वांना विशेषत: रात्रीच्या वेळी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस शांतता समितीच्या सदस्यांच्या संपर्कात आहेत. प्रत्येकाने आपापल्या भागात सुरू असलेल्या उपक्रमांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. पोलिसही सर्व समाजाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी लागेल.
दरम्यान, रविवारी कामठी येथे दोन कुटुंबांमध्ये किरकोळ वाद झाला. सोशल मीडियावर काही लोकांनी याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कामठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील एका भागात राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये पार्किंगवरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवीगाळ, हाणामारीही झाली. सर्व काही सामान्य होते पण काही लोकांनी सोशल मीडियावर जातीय तणावाची बातमी पसरवली. या घटनेची माहिती मिळताच डीसीपी श्रावण दत्त व इतर अधिकारी कामठी येथे पोहोचले. दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.