नागपूर : शहरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगाजमुनातील देहव्यापार बंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी गंगाजमुना वस्तीत छापेमारी केली. या कारवाईदरम्यान देहव्यापार करणाऱ्या १८ तरुणी आणि १२ ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. या कारवाईमुळे गंगाजमुनात खळबळ उडाली.
गंगाजमुना वस्तीत मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवून घेतल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोटे यांच्या नेतृत्वात बुधवारी गंगाजमुना वस्तीत छापा टाकला.
या कारवाईसाठी लकडगंज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह पाचपावली, गणेशपेठ, तहसील आणि शांतीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. वेश्या व्यवसायाच्या खोल्यांमधून देहव्यापार करणाऱ्या तरुणी आणि ग्राहक पकडले गेले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या देहव्यवसाय करणाऱ्या महिलांना आणि ग्राहकांना लकडगंज पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.