नागपूर : आमदार रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निकाला आधीच राहुल नार्वेकर राजीनामा देतील, असा दावा पवारांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिला. तर दुसरीकडे राहुल नार्वेकरांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुनावणीत खंड पडू दिलेला नाही. मात्र आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीत वेळ काढूपणा करण्यासाठी राहुल नार्वेकर राजीनामा देऊ शकतात, असा अंदाज रोहित पवारांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत, मग आता अजून टाईमपास कसा करायचा, अध्यक्ष कदाचित राजीनामा देतील. नवीन अध्यक्ष निवडायला थोडा वेळ जाईल, अशी संभावना सांगता येईल. अध्यक्ष निर्णय घेणार नसतील तर कोर्ट निर्णय घेईल.
दरम्यान रोहित पवार यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले. रोहित पवार फक्त चमकोगिरी करत आहेत, संघर्ष यात्रेला 100 लोकही जमत नव्हते. फेसबुक आणि ट्विटरवरून राजकारण करता येत नाही. अध्यक्ष राजीनामा देणार, हे यांना कुणी सांगितले? ही यांच्या मनातली स्वप्न आहेत, सरकार पडण्याचा काही मुद्दा नाही. सरकार आपलं टर्म यशस्वी पूर्ण करेल, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.