हरियाणा : देशात लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले. त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. आता दुपारी एक वाजता शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.भाजपचे पर्यवेक्षक म्हणून अर्जुन मुंडा आणि तरूण चुघ हरियाणामध्ये दाखल झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भातून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. सध्या 90 जागांपैकी भाजपकडे 41, काँग्रेसकडे 30, आयएनएलडीकडे 10, एचएलपीकडे एक आणि सात अपक्ष आहेत. हरियाणात 46 आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत हरियाणात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या, तेव्हा त्यांनी जेजेपीच्या १० आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. जेजेपीसोबत युती केल्यानंतर दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.
जागावाटपासंदर्भातून मतभेद –
येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भातून मतभेद निर्माण होऊन युती तुटली आहे. दोन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत समाधानकारक पर्याय न निघाल्याने दोन्ही पक्षांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. भाजप-जेजेपी युती तुटली तरीदेखील त्याचा भाजपवरती मोठा परिणाम होणार नसल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे भाजपचे 41 आमदार असून 7 अपक्षही त्यांच्या समर्थनात आहेत. दरम्यान,हलोपाचे आमदार गोपाल कांडा यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळत आहेत.