मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे. परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे.
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय नेतेदेखील निवासस्थानी उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांसह या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसाठी निवडणूक आयोग काही वेळात पत्रकार परिषद घेणार आहे.
तत्पूर्वी प्रहारचे संस्थापक बच्चू कडू मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत. गेल्याच महिन्यात बच्चू कडूंनी राजू शेट्टी, युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या साथीने परिवर्तन महाशक्तीची घोषणा केली.
तिसऱ्या आघाडीच्या रुपात आपण मतदारांना पर्याय देणार असल्याचे या नेत्यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात सांगितले.मात्र आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत राजकीय समीकरण बदलणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.