Published On : Mon, Mar 14th, 2022
By Nagpur Today Nagpur News

‘पॉंडीचेरी’, पॉंडीचेरीमध्ये पहिल्यांदाच झळकला मराठी चित्रपट

१८ मार्चपासून ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर

काही दिवसांपूर्वी ‘पॉंडीचेरी’ हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा भारतातातील पहिला चित्रपट आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्यासोबत आणखी एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे आणि ही व्यक्तिरेखा म्हणजे ‘पॉंडीचेरी’ शहर.

Gold Rate
Friday 21 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या निसर्गरम्य, रंगीबेरंगी शहरात नात्यांना हळुवार रंगवणारी एक प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. नात्याची एक वेगळी परिभाषा अधोरेखित करणाऱ्या या सिनेमाने चित्रपटगृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष अभिमानास्पद बाब म्हणजे या चित्रपटाचा पॉंडीचेरीमधील चित्रपट महोत्सवात विशेष शोसुद्धा सादर करण्यात आला. या व्यतिरिक्त तेथील चित्रपटगृहातही ‘पॉंडीचेरी’चे शोज लावण्यात आले आहेत. पॉंडीचेरी शहरात मराठी चित्रपट झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या सगळ्यात पॉंडीचेरी सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे विशेष सहकार्य लाभले आहे.


‘पॉंडीचेरी’च्या यशाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” पॉंडीचेरीसारख्या अमराठी शहरातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट झळकावा, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आम्ही पॉंडीचेरी सरकारचे विशेष आभार मानतो, त्यांनी आम्हाला ही संधी दिली. नेहमीच्या प्रेमकहाणीपेक्षा ही एक वेगळी प्रेमकहाणी आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल. चित्रपटगृहाच्या प्रदर्शनानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील मराठी प्रेक्षकही हा चित्रपट कुठेही आणि कधीही पाहू शकतील. या चित्रपटात बरेच प्रयोग करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे. याची जाणीव चित्रपट पाहताना अजिबात होत नाही. प्रत्येक सीन, तिथले आजूबाजूचे सौंदर्य खूपच बारकाईने टिपण्यात आले आहेत. कलाकारांसह केवळ पंधरा लोकांसोबत चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटाला कलाकारांनी मेकअपशिवाय त्यांच्या अभिनयाच्या सौंदर्याने चारचाँद लावले आहेत.”

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत ‘पॉंडीचेरी’ या चित्रपटात सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शनासोबतच लेखक आणि निर्मात्याचीही भूमिका बजावली आहे. तर नील पटेलही चित्रपटाचे निर्माता आहेत. मोहमाया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट १८ मार्चपासून प्रेक्षकांना ‘प्लॅनेट मराठी’ओटीटी पाहता येणार आहे.

Advertisement