कामठी :-आज दि. 13 नोव्हेंबर 2019 रोजी बिडगाव येथील हायटेंशन लाइनच्या जवळ असणारी घरे व कंपन्या तोडण्यात आल्या. गरीबांचे संसार उघडयावर आले तर ग्रामपंचायतची प्रशासकीय इमारत आणि जिल्हा परिषद शाळा यांच्यावर मात्र कारवाई झाली नाही. उच्च न्यायालयामध्ये हायटेंशन लाइन लगतच्या वास्तु संदर्भातील याचिका सुरू होती. या याचिकेतील न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 11 किलोवॅट (KV) लाइन लगत वर्टिकल व होरीझोंटल असे 2.4 मिटर अंतर सोडण्याविषयी तर 23 किलोवॅट (KV) लाइन लगत 17.5 मिटर अंतर सोडण्याविषयी निर्देशित केले आहे. या अंतरावर असणार्या वास्तु, घरे, कंपन्या, इमारती, इत्यादी तोडण्याविषयीचे निर्देश उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आले. त्यानुसार MMRDA चे कार्यकारी अभियंता सुमित अवस्थी यांच्या नेतृत्वात ही कारवाई पूर्ण करण्यात आली. प्रसंगी कूलर कंपनी, डोअर लॅमिनेट कंपनी, कपाट कंपनीचे गोडाऊन तोडण्यात आले. तसेच गजानन हरशूलकर, प्रितम बन्सोड, यशवंत सनोडिया यांची घरे पूर्णत: तोडण्यात आली व हे सर्व परिवार बेघर झाले. पुढील कारवाई उद्यापासून होणार आहे.
मात्र याच परिसरात असलेली ग्रामपंचायतीची इमारत जी शासकीय निधीतून बांधण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा देखील या हायटेंशन लाइन लगत आहे. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड रोष होता. मागील 10-12 वर्षांपासून ग्रामपंचायत या नागरीकांकडून कर वसूल करत आहे. तसेच या परिवारांकडे व कंपन्यांकडे विजेचे कनेक्शन सुद्धा उपलब्ध आहेत. लेआऊट मालकांनी अनाधिकृतरित्या लेआऊट विकून गोरगरिबांना फसविले आहे. हा गोरखधंदा प्रशासकीय अधिकार्यांच्या संगनमताने अजूनही सर्हास सुरू आहे. परंतु याचा बळी मात्र गोरगरीब व निरक्षर जनता पडली आहे. यापूर्वी मागील दोन वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्य अवंतिका लेकुरवाळे आणि आशिष मल्लेवार यांनी हायटेंशन लाइन अंडरग्राऊंड करण्याविषयी संल संलग्नित विभागाला निवेदने सादर केलीत. परंतु ऊर्जा विभाग व ऊर्जा मंत्री यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. यामुळे अनेक नागरिक आज संकटात सापडलेले आहेत.
आज सकाळपासूनच प्रा. अवंतिका लेकुरवाळे नागरिकांच्या मदतीला धावून गेल्या. बेघर झालेल्या परिवारांचे सांत्वन करीत त्यांची तात्पुरती राहण्याची व खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था त्यांनी केली. सोबतीला आशिष मल्लेवार, प्रमोद पटले, चिंतामण मेश्राम, नंदाताई ठाकरे, इत्यादी मंडळी होती.
वार्ताहारांशी बोलतांना प्रा. अवंतिका लेकुरवाळे म्हणाल्या की, अनाधिकृत लेआऊट विकले जात असतांना डोळे बंद करून लेआऊट मालकांना मदत करणारे तत्कालीन MMRDA चे, नागपुर सुधार प्रन्यासचे प्रशासकीय अधिकारी, जागा अकृषक (NA)करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देणारेग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि अधिकारी तसेच संलग्नित विभागाचे सर्व अधिकारी, मौकाचौकशी न करता कर आकारणी करणारे अधिकारी, विद्युत पुरवठा करणारे अधिकारी या सर्वांवरच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी प्रा. अवंतिका लेकुरवाळे – कामठी मौदा विधानसभा प्रमुख महिला कॉंग्रेस आणि आशिष मल्लेवार यांनी केली.
संदीप कांबळे कामठी