खराब रस्त्यांचा फटका सर्वसामान्य जनतेला अनेकदा बसतो आणि संताप व्यक्त करण्यापलिकडे सामान्य व्यक्ती काहीही करु शकत नाही. पण याचा फटका चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही बसलाय. तीन दिवसांनंतर ही माहिती समोर आली आहे. परळीहून सर्वधर्मिय विवाह सोहळा आटोपून मुख्यमंत्री जेव्हा परत जात होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं टायर फुटलं. ज्यामुळे त्यांना दुसरी गाडी येईपर्यंत वाट पाहावी लागली आणि कोणतीही सुरक्षा नसलेल्या गाडीने ते रवाना झाले.
परळी येथून लग्नसोहळा आटोपून परभणी मार्गे नांदेडकडे निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे टायर खड्ड्यात फुटल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, या मागणीसाठी सोनपेठच्या पत्रकारांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं. मुख्यमंत्री 22 फेब्रुवारी रोजी परळीहून नांदेडकडे निघाले असता, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे खराब रस्त्यावर असलेल्या खड्यात गाडी गेली आणि टायर फुटलं. घटना परळी ते गंगाखेड येथील निळा पाटीजवड घडली.
घटना समजताच गाडी थांबवून मुख्यमंत्रांना काहीकाळ रस्त्यावर उभं राहावं लागलं. कुठलीही सुरक्षा नसणाऱ्या एका खासगी गाडीत बसून नांदेडकडे जावं लागलं. त्यामुळे सोनपेठ येथील पत्रकारांनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीसाठी खड्ड्यात आंदोलन केलंय. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने परळीत सर्वधर्मिय विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
सध्या मराठवाड्यातील अनेक प्रमुख रस्त्यांचं काम सुरु असलं तरी तालुक्यांना आणि गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था तशीच आहे. तीन वर्षांपूर्वी सोनपेढच्या गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी 59 दिवस साखळी उपोषण केलं होतं. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिलं नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं टायर फुटल्यानंतरही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.