– दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचा पुढाकार
महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशावरुन आजही त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. खेडी विकसित झाली तरच देशाचा विकास होईल, हे ते जाणून होते. आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेवरच देशाचा विकास अवलंबून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था विकसीत होण्यासाठी ग्रामोद्योग स्थापित होणे आणि ते उत्तमरित्या चालणे आवश्यक झाले आहे, हे ही तितकेच खरे!
विद्यमान स्थितीत ग्रामविकासाची संकल्पना ही शेतीपूरक उद्योगांचा विकास होणे, त्यांची भरभराट होणे, कृषीपूरक व्यवसायातून सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे, यावर अवलंबून आहे. शासन सेवाक्षेत्रावर भर देत आहे. त्यामुळे केवळ पारंपरिक शेती करुन चालणार नसून, शेतीला पूरक असा दूध व्यवसायही करता येतो.
कोरोना या जागतिक महामारीचा सर्वच क्षेत्राला फटका बसला त्यात कृषीपूरक उत्पादनांचाही समावेश होतो. नागपूर विभागाचा विचार करता, कोरोनामुळे सर्व व्यवहार काही काळासाठी थांबले. पूर्व विदर्भातील जिल्ह्यात दुधाचे उत्पादन होते. मात्र दुधाची मागणी वाढली असली तरीही वाहतूक व वितरण व्यवस्था बंद राहिली. एरव्ही खासगी दूध खरेदीदार दूध उत्पादकांकडून 30 ते 32 रुपये प्रति लिटर दराने दुधाची खरेदी करतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांनी भाव पाडल्याची तक्रार असून, परिणामी शेतक-यांना शासकीय दूध संकलन केंद्राकडे अतिरिक्त दुधाची विक्री करावी लागली, आणि शासनाच्या दुग्धविकास विभागाने ती खरेदी केली.
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री सुनील केदार यांच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांकडून त्याचे संकलन करुन त्यापासून भुकटी बनविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. दरवर्षी दुधाच्या वाढत्या मागणीनुसार शेतकरी खासगी डेअरींना जास्त भावाने विकतात. मात्र लॉकडाऊनमुळे वितरण व्यवस्था बंद राहिल्यामुळे दुधाची मागणी घटली आणि जिल्ह्यातील उत्पादित दूध हे शासनाने संकलित केले.
या कालावधीत शासकीय दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून दूध संकलनातून तब्बल एक लाख 11 हजार 908 किलो दुधाची भुकटी तयार करण्यात आली. घटलेल्या मागणीमुळे शिल्लक राहिलेल्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यातील दुधापासून दूध भुकटी बनविण्यात आली. गतवर्षी जानेवारी 2020 मध्ये 2 लाख 54 हजार 665 लिटर, फेब्रुवारी 2 लाख 47 हजार 863, मार्च 3 लाख 43 हजार 418, तर एप्रिल 4 लाख 28 हजार 790, मे 5 लाख 51 हजार 87, जून 6 लाख 18 हजार 210 आणि जुलै 5 लाख 66 हजार 866 लिटर दुधाची खरेदी करण्यात आली. मात्र नंतर लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर दुधाच्या मागणीत वाढ झाली. लॉकडाऊन कालावधीत 13 लाख 34 हजार 84 लिटर दुधापासून 1 लाख 11 हजार 908 किलो दूध भुकटी बनविण्यात आली. भुकटीपूर्वी दुधावरील सायीपासून 55 टन 239 किलो बटर बनविण्यात आले. साधारणत: दुधाच्या सायीपासून बनणाऱ्या बटरला 315 रुपये प्रती किलोचा दर बाजारात मिळत असतो. तर दूध भुकटी 296 रुपये प्रति किलो दराने बाजारात विकली जाते.
दरवर्षी दुधाचे वाढीव उत्पादन हे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान होत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विदर्भातील पर्जन्यमानातील बदल, दुभती जनावरांमध्ये झालेली घट, शेतकऱ्यांचा दुभत्या जनावरांवर चारा पाणी, सांभाळण्याचा, आणि औषधी, पोषक खुराकावर होणारा वाढता खर्च या बाबी कारणीभूत ठरत आहेत. परिणामी शेतकरी दुभती जनावरे सांभाळण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
दुधाच्या वाढत्या मागणीमुळे भुकटी बनविण्यासाठी दूध मिळत नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात दूध भुकटी तयार होत नाही. मात्र लॉकडाऊनमुळे राज्य शासनाच्या दुग्धविकास व पशूसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडील अतिरिक्त दुधापासून दूध भुकटी तयार करुन त्यांना आधार दिला आहे.
नागपूर विभागात उत्पादक शेतकऱ्यांकडून शासकीय दूध संकलन केंद्रावर दूध संकलन करण्यात आले. शेतकऱ्यांना खासगी दूध संकलन केंद्रांनी अडचणीत आणले असले तरीही शासनाने मदतीचा हात देत त्यांच्याकडील दुधापासून भुकटी व दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले. दरवर्षी वाढीव संकलनातील मिळणाऱ्या दुधापासून भंडारा जिल्ह्यातील जिल्हा दूध उत्पादक संघ, दाभा, वरठी रोड येथे भुकटी बनविली जाते.