नागपूर: कन्हान परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वाहिनीजवळ शेतातील कचरा पेटवल्याने खंडित झालेला वीज पुरवठा संध्याकाळी ७वाजता सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.वीज वाहिनी जवळ कचरा पेटवल्याने पाच हजार वीज ग्राहक तासभर अंधारात होते.
कन्हान आणि गोंडेगाव भागात महावितरणच्या न्यू गोंडेगाव वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीचे काम झाल्यावर शेतातील कचरा वीज वाहिनी जवळ आणून पेटवून दिला. परिणामी येथून जाणाऱ्या महावितरणच्या ३३के.व्ही.
वीज वाहिनीला याची झळ पोहोचली.परिणामी २ उच्यदाब वीज ग्राहकांसह पाच हजार लघु दाब वीज ग्राहकांना याचा फटका बसला.महावितरणचे न्यू गोंडेगाव वीज उपकेंद्र बंद पडले. दरम्यान कोणीतरी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना आगीमुळे वीजपुरवठा बंद झाल्याची माहिती दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाय योजना करून आगीवर नियंत्रण मिळवले. अंधार पडल्याने रात्री या परिसरात पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु केला.
वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका असे आवाहन महावितरणकडून वारंवार करूनही नागरिक वीज यंत्रणेजवळ कचरा जाळून ऐन ऊन्हाळ्याचे दिवसात आपली गैरसोय करीत आहेत.