नागपूर : महाराष्ट्रातील जनतेने विश्वास दाखवत महायुतीला सत्ता दिली. याच जनतेसह आमदारांनी, वरीष्ठ नेत्यांनी मला जी संधी दिली आहे,त्याचे सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन. हे करताना कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये ते बोलत होते. यादरम्यान त्यांनी विविध पत्रकरांच्या विविध प्रश्नांची उत्तर देत राजकीय विषयांवरहि भाष्य केले.
पारदर्शी प्रामाणिक सरकार चालले पाहिजे हा माझा आग्रह असेल. त्यावरच टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. राजकारणात सर्व पातळीवर जाऊन लोक आव्हान निर्माण करतात. पण कितीही मोठं आव्हान असेल, तरी धैर्याने त्या आव्हानाचा मी सामना करतो. मी राजकारणात ज्या विचारांनी आलो, त्यात सत्ता हे सेवेचं माध्यम असल्याचे मला वाटते. त्यामुळे कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल –
राज्यात महायुती सरकारची सत्ता स्थापन झाली असून पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. फडणवीस यांनीही एका पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.मला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल असे फडणवीस म्हणाले आहे.
पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. त्यांनी मला बीडला पाठवलं तर बीडला जाईन. पण माझ्यामते साधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे कोणतं पालकमंत्रीपद ठेवत नाहीत. पण माझी इच्छा अशी आहे की गडचिरोलीचं पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावं. त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल
शिंदे सरकारच्या कार्यकाळात फडणवीस नागपूर आणि गडचिरोलीचे पालकमंत्री राहिले आहेत एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या काळात त्यांनी गृह आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची मंत्रालये भूषवली. पालकमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे गृह जिल्हा नागपूरसह गडचिरोली जिल्ह्याचाही कार्यभार होता, हे विशेष.
जनतेच्या मनातील कामे करण्यास प्राधान्य-
लोकसभा निवडणुकीत जरी आम्हाला फाटका बसला तरी विधानसभादरम्यान जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला. कोणताही बहुमताचा कौल जबाबदारी घेऊन येत असतो. आता ती जबाबदारी आमच्यावर आली आहे. काम करताना काही अडचणी येतात, मर्यादा असतात. त्यावर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजेत हा प्रयत्न आपल्याला करायचा असल्याचे फडणवीस म्हणाले.
२० लाख घरं पंतप्रधान आवास योजनेत मंजूर –
केंद्राच्या मदतीने महाराष्ट्राला गतीने पुढे न्यायचा आमचा प्रयत्न आहे. परवा शिवराजसिंह चौहान आले होते. त्यांनी एकाच वर्षात आपल्याला २० लाख घरं पंतप्रधान आवास योजनेत मंजूर करून दिली असल्याचेही फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात-
महायुती सरकारला बहुमत मिळण्यास लाडकी बहीण योजनेचे मोठे योगदान आहे.
गेल्या अडीच वर्षांत राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी संधी मिळाली, त्यातही अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली. ऊर्जा विभागात पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅप आपण तयार केला आहे. आता लाडकी बहीण योजनेचाही डिसेंबरचा हप्ता आपण जमा करायला सुरुवात केली असल्याचे फडणवीस म्हणाले.
विदर्भात सिंचनाचे ८० प्रकल्प पूर्ण केले-
महाराष्ट्रात २०१४ साली जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा अनेकांच्या मनात शंका होती की हा मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल? पण लोकांची शंका लवकरच दूर झाली. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर आपण अन्याय होऊ दिला नाही. विदर्भात सिंचनाचे ८० प्रकल्प आपण पूर्ण केले आहेत. त्याचवेळी राज्यातील इतर भागातील प्रकल्पही आपण पूर्ण केले, असे फडणवीस म्हणाले.