मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रसिद्धी विभागाकडून करण्यात येत असलेल्या प्रकारावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले की,महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्र्यांना होस्ट करण्यास सांगत आहेत.पण मिंधेंना माझं एक आव्हान आहे. त्यांना माझ्यासोबत वन टू वन पॉडकास्ट करू द्या.
या पॉडकास्टमध्ये त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुजरातला पाठवलेल्या सर्व उद्योगांबद्दल बोलूया. त्यांनी स्वतःच्या संधीसाठी आमच्या पाठीवर वार केला, पण आमच्या तरुणांनी त्यांच्या नोकरीच्या संधी का गमावल्या? आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या का वाढत आहेत, शहरी गुन्हेगारी वाढत आहे आणि महिला असुरक्षित आहेत. पण ते निर्लज्जपणे ठेकेदार मित्रांसाठी आपल्या पदाचा वापर करून महाराष्ट्राला लुटत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
दरम्यान लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्यापासून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर, दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यातील मतदानाकरता उमेदवारी अर्ज भरण्यासाठीही महाराष्ट्रात हालचालींना वेग आला आहे.