मनपा शाळांत प्रवेश उत्सव : गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत, गणवेश आणि पुस्तकांचेही वाटप
नागपूर: मुलांना शाळेत येण्याची हुरहूर लागावी, आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा यासाठी मनपा शाळांमध्ये बुधवारी (ता. २६) पहिल्याच दिवशी ‘प्रवेश उत्सव’ साजरा करण्यात आला. कुठे प्रभातफेरी निघाली, कुठे विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली, कुठे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर कुठे विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करून विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिली. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले तर विविध शाळांमध्ये पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने मनपा शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला.
‘प्रवेश उत्सवा’चा मुख्य कार्यक्रम विवेकानंदनगर येथील विवेकानंदनगर माध्यमिक शाळेत पार पडला. शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, मुख्याध्यापिका रजनी वाघाडे, शाळा निरीक्षक संजय दिघोरे, शाळाप्रमुख श्री. दाभेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती भुवनेश्वरी, माध्यमिकचे श्यामकुमार शिव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तक वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, विद्यार्थ्यांना शाळेचा कंटाळा येऊ नये तर शाळेविषयी आपुलकी आणि आस्था निर्माण व्हायला हवी. गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही हाच प्रयत्न केला. आवश्यक ते बदल केले. यामुळे आता मनपा शाळांमध्ये पटसंख्या वाढू लागली आहे. यापुढे मनपा शाळांतून इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा मानस असून लवकरच हा प्रस्ताव सत्यात उतरेल, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शाळांच्या निकालाचा टक्का वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. संचालन जया दवे यांनी केले. आभार अर्चना बालेकर यांनी मानले.
संजयनगर हिंदी माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मंगळवारी (ता. २५) विद्यार्थ्यांच्या घरी भेट दिली. बुधवारी (ता. २६) प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर शाळेत आयोजित कार्यक्रमाला नगरसेवक अनिल गेंडरे, नगरसेविका सरीता कावरे, मुख्याध्यापक रवींद्र गावंडे, शाळा निरीक्षक दमयंती सोंडागर, प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिल बारस्कर, मुख्याध्यापिका अनिता गेडाम, केंद्र समन्वयक शेषराव उपरे, शाळाप्रमुख ज्योती काकडे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक अनिल गेंडरे आणि नगरसेविका सरीता कावरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मनपा शाळेचे नाव आपल्या कर्तृत्वाने उंचवावे, असे आवाहन केले. कार्यक्रमानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. संचालन विठ्ठल खोंडे यांनी केले. आभार कल्पना महल्ले यांनी मानले.
दत्तात्रयनगर माध्यमिक शाळेत माजी क्रीडा सभापती नागेश सहारे आणि नेहरूनगर झोनच्या माजी सभापती रीता मुळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना गणेवश आणि पुस्तकांचे वाटपही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. दुर्गानगर प्राथमिक शाळेमध्ये हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे यांच्यासह झोनच्या माजी सभापती रूपाली ठाकूर, नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका रिता मुळे, स्वाती आखतकर, कल्पना कुंभलकर, सहायक आयुक्त राजू भिवगडे, विभागीय अभियंता श्री. हेडाऊ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती बोरकुटे, उपाध्यक्षा श्रीमती कावळे यांची उपस्थिती होती.
वाल्मिकीनगर शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमाला तरंग संस्थेच्या अध्यक्ष साधना झा, व्ही.एन.आय.टी.चे सेवानिवृत्त प्रा. देशपांडे, शाळा निरीक्षक नंदा मेश्राम, मुख्याध्यापिका संध्या मेडपल्लीवार यांची उपस्थिती होती. प्रा. देशपांडे यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अभिनव प्रकल्प यावेळी जाहीर करण्यात आला. या प्रकल्पाचा खर्च ते स्वत: करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तरंग संस्थेच्या अध्यक्षा साधना झा यांनी संस्थेतर्फे वर्षभर क्रीडा विषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मुख्याध्यापिका संध्या मेडपल्लीवार यांनी शाळेत वर्षभर राबविण्यात येणार असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शिक्षिका रजनी परिहार यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त शाळेची शपथ दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. संचालन हर्षा भोसले यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यावेळी उपस्थित होते.
मनपाच्या जयताळा माध्यमिक शाळा, शिवणगाव माध्यमिक शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा, बॅरिस्ट शेषराव वानखेडे माध्यमिक शाळा, बस्तरवारी माध्यमिक शाळा, डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळा, सुरेंद्रगड माध्यमिक शाळा, लाल बहादूर शास्त्री माध्यमिक शाळा, नेताजी मार्केट माध्यमिक शाळा, पन्नालाल देवाडिया माध्यमिक शाळा, सरस्वती तिवारी माध्यमिक शाळा, हंसापुरी माध्यमिक शाळा, शे.ब.गो.गो. माध्यमिक शाळा, कपिलनगर माध्यमिक शाळा, हाजी अब्दुल मस्जिद लिडर माध्यमिक शाळा, ताजाबाद उर्दु माध्यमिक शाळा, गंजीपेठ उर्दु माध्यमिक शाळा, साने गुरुजी माध्यमिक शाळा, कुंदनलाल गुप्ता माध्यमिक शाळा, एम.ए.के. आझाद माध्यमिक शाळा, कामगारनगर माध्यमिक शाळा, गरीब नवाजनगर माध्यमिक शाळा, पेंशन नगर माध्यमिक शाळा, पारडी मराठी उच्च माध्यमिक शाळा क्र. १, दुर्गानगर हिंदी प्राथमिक शाळा, जाटतरोडी हिंदी उच्च प्राथमिक शाळा, संजयनगर माध्यमिक शाळा, बिडीपेठ मराठी प्राथमिक शाळा, जानकीनगर मराठी प्राथमिक शाळा, भीमनगर मराठी प्राथमिक शाळा, जी.एम. बनातवाला शाया, एकात्मतानगर मराठी प्राथमिक शाळा आदी शाळांमध्येही पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यानच्या उपस्थितीत ‘प्रवेश उत्सव’ साजरा करण्यात आला.