नागपूर: एकापेक्षा एक भक्तिरसाने ओतप्रोत भजनांनी आज रसिकांना भक्तिरसात चिंब भिजविले. रेशीमबाग मैदानावर नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात प्रसन्न जोशी यांनी सादर केलेल्या भजनसंध्येने मेळाव्याचा चौथा दिवस गाजविला.
मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी गायक कलावंत प्रसन्न जोशी यांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. यावेळी मंचावर महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सर्व कलावंतांचे स्वागत केले.
यानंतर भजनसंध्या आणि गजल कार्यक्रमाला सुरुवात झाली. गणेश स्तवनाने गायक कलावंत प्रसन्न जोशी यांनी सुरुवात केल्यानंतर एकापेक्षा एक सरस भजन आणि गझल त्यांनी सादर केल्या. झुकी झुकी सी नजर , रंजीशे सही, छुपके छुपके रात दिन, हम तेरे शहर में आये है अशा एका पेक्षा एक सरस गजलांवर रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रसन्न जोशी यांच्या गजलांना डॉ.देवेंद्र यादव यांनी तबल्यावर, उस्ताद नासीर खान यांनी सतारवर, राहूल मानेकर यांनी हार्मोनियमवर, सौरभ किल्लेदार यांनी की बोर्डवर, अरविंद उपाध्याय यांनी बासरीवर यांनी साथ दिली.
स्टॉल्सवरील गर्दी वाढली
नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या चौथ्या दिवशी नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली. मेळाव्यात विदर्भातील विविध बचत गटांच्या उत्पादनांचे सुमारे ३०० स्टॉल्स लागले आहेत. या सर्व स्टॉल्सवर दुपारपासूनच चांगली गर्दी होती. मेळाव्यात आलेल्या महिलांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. सर्व स्टॉल्स दुपारी १२ वाजतापासून रात्री १० पर्यंत नागपूरकरांकरिता खुले असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.
पाककृती कार्यशाळा
महिला उद्योजिका मेळाव्याच्या चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जयम त्रिवेदी यांनी विना अंड्याचा केक, सॅंडविच, समोसे आदींच्या पाककृती सादर केल्या.