नागपूर: इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी पोलिसांकडून अटक होऊ शकते. मात्र कोरटकर हा आता दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल झाल्याने या चर्चांना उधाण आले आहे. प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचा आरोप आहे.
या फोन कॉलची रेकॉर्डिंग सगळीकडे व्हायरल झालेली आहे. याच फोन कॉलमध्ये प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केली. तसेच बोलताना छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यानंतर त्याने न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती आहे. मात्र ही चर्चा सुरू असून यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशांत कोरटकर याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक झाली असती. त्यामुळेच कोरटकर दुबईला पळून गेल्याची शक्यता आहे. मात्र, आता तो थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, प्रशांत कोरटकर हा अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करेल. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला तरच तो भारतात परतेल, अन्यथा आणखी काही काळ दुबईतच मुक्काम करेल. मात्र, तोपर्यंत नागपूर पोलीस आणि कोल्हापूर पोलीस कोरटकर विरोधात कोणते कठोर पाऊले उचलतात, हे पहावे लागेल.