नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करण्याच्या आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर यांचा थांगपत्ता नाही. सध्या कोरटकर गायब असल्याचे तो आहे तरी कुठे? कोणती राजकीय शक्ती त्याच्या पाठीशी आहे, असे विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल –
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोरटकर याला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पाच पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल स्विचऑफ असल्याने तो लपलेल्या ठिकाणाची माहिती मिळालेली नाही. त्याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला आहे. समन्वयातून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आय म्हणाला प्रशांत कोरटकर ?
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक ध्वनिफीत फेसबुकवर सामायिक केली आहे. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिल्याचा आरोप आहे.
तसेच राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ध्वनिफीतमध्ये ऐकू येत आहे. या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरटकर यांच्या घरासमोर सकल मराठा महासंघाचे आंदोलन –
कोरटकर याच्या आक्षेपार्ह विधानानंतर मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.कोरटकर यांच्या घरासमोर मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हस्तेक्षेप करत आंदोलनकर्त्यांना शांत केले. कोरटकरला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
प्रशांत कोरटकर यांच्या पाठीशी राजकीय शक्ती-
.प्रशांत कोरटकर यांच्या पाठीशी राजकीय शक्ती आहे. कोरटकर याला राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याचा नेहमी गृहमंत्रालयात वावर असतो,असा आरोपही सकल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोरटकर याला कोणता नेता पाठीशी घालत आहे, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.