नागपूरः डॅाक्टरांच्या पावतीशिवाय औषध विकण्यासंदर्भात वृत्त प्रकाशित करण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. अग्रवाल यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
प्रतिक पांडे, रितेश वाजपेयी आणि हसीब खान अशी पत्रकारांची नावे आहेत. मेयो चौक परिसरातील कांचन मेडिकल स्टोअर असून त्यातून डॅाक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय वायग्रा १०० या औषधाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्याचे वृत्तांकन करण्यासाठी २९ ॲागस्टला काही पत्रकार तेथे गेले होते. यावेळी पत्रकार असल्याचे सांगून ५ लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप औषध विक्रेता निशांत गुप्ता यांनी केला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. या प्रकरणी प्रतिक पांडे, रितेश वाजपेयी व हसीब खान यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला.
आरोपी पत्रकारांच्या वतीने ॲड. मंगेश राऊत व ॲड. नाझीया पठाण यांनी बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले आरोपी पत्रकार असून त्यांना खोट्या गुन्ह्यांत फसवण्यात आले आहे. केवळ संशयाच्या आधारावर पोलीस त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा युक्तिवाद केला. सरकारी पक्षाचीही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना तात्पुरता जामीन मंजूर केला.