नागपूर : संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परिक्षा-2020, रविवार दिनांक 4 ऑक्टोबर, 2020 रोजी नागपूर येथील 45 केंद्रावर सत्र-1 सकाळी 9.30 ते 11.30 व सत्र-2 दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत आयोजित केलेली आहे. परिक्षेला यावर्षी नागपूर केंद्रावर एकूण 17 हजार 701 परिक्षार्थी परिक्षा देणार आहेत. परिक्षेचे यशस्वी आयोजनाकरीता सर्व 45 केंद्रांवर पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपीक असे एकूण अंदाजे हजार अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याशिवाय परिक्षा संघ लोकसेवा आयोगाचे निर्देशानुसार सुरळीत पार पाडण्याकरीता प्रत्येक केंद्राकरीता एक असे 45 स्थानिक निरिक्षण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नागरी सेवा (पूर्व) परिक्षा-2020 करीता संघ लोकसेवा आयोगाद्वारे काही विशिष्ट बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर प्रवेश हा प्रथम सत्राकरीता सकाळी 9.20 वाजेपर्यंत तसेच द्वितीय सत्राकरीता दुपारी 2.20 वाजेपर्यंतच देण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याही परिक्षार्थीस परिक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही तसेच परिक्षार्थी यांना आयोगाने नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावरच परिक्षा देता येणार आहे. जिल्हयातील इतर कोणत्याही परिक्षा केंद्रावर परिक्षार्थीस परिक्षा देता येणार नाही. याबदलाबाबत परिक्षार्थींनी नोंद घ्यावी व त्यांना नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर व नियोजित वेळेतच उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
परिक्षार्थीस प्राप्त झालेल्या परिक्षेच्या प्रवेश पत्रावरील माहिती काळजीपुर्वक वाचून सर्व सूचनांचे पालन परिक्षार्थीने काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत नागपूर शहरात कोविड-19 चा प्रादुर्भाव तसेच बहुतांश ठिकाणी मेट्रोची कामे सुरु असल्याने किंवा इतर कारणाने परिक्षार्थीस परिक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशिर झाल्यास कोणत्याही उमेदवारास अतिरिक्त वेळ मर्यादा वाढून देण्यात येणार नाही. परिक्षार्थीस परिक्षा केंद्रावर प्रथम सत्राकरीता सकाळी 9.20 नंतर व द्वितीय सत्राकरीता दुपारी 2.20 नंतर प्रवेश देण्यात येणार नसल्याने परिक्षार्थीने वेळेवर पोहचण्याची स्वत:च्या स्तरावर विशेष काळजी घ्यावी. तसेच नागपूर शहरातील कोरोना विषाणुंचा वाढता प्रादुर्भाव बघता आयोगाच्या निर्देशानुसार परीक्षा केंद्रावर मास्क लावून यावे, सोबत हॅण्ड सॅनिटायझर बाळगावे व कोविड-19 अनुषंगाने विशेष दक्षता परिक्षार्थीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.
परिक्षार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, ओळखपत्र, काळा बॉल पाईन्ट पेन तसेच आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही म्हणजे कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, आयपॅड इत्यादी इलेक्ट्रोनिक साधणे परिक्षा केंद्रामध्ये आत नेण्यास मनाई आहे, याची नोंद घ्यावी. परिक्षा सुरळीत, शांततेत पार पाडण्यास उमेदवारांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.