नागपूर: विदर्भातील मेगा इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह ‘खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भ’ चे आयोजन 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान होत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. विविध सत्रांसाठी तयार करण्यात आलेले डोम तयार झालेले असून तयारीवर शेवटचा हात फिरवला जात आहे.
विदर्भात निरनिराळ्या क्षेत्रात उद्योजक, व्यावसायिक, आणि निर्माते कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणींची सोडवणूक,उद्योगांना प्रोत्साहन आणि नव्या उद्योगांसाठी सोयी, सुविधांची उभारणी यासाठी अॅडव्हान्टेज विदर्भ प्रदर्शनाचे आयोजन असून हाच या प्रदर्शनाच्या आयोजनामागील हेतू असल्याची भूमिका असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट (एड)चे अध्यक्ष आशिष काळे आणि सचिव डॉ. विजय शर्मा यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केली. खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हांटेज विदर्भ मध्ये सहभागी संघटना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्सचे निर्माते यांच्याशी गुरुवारी एक्स्पोच्या तयारीची माहिती देण्याकरीता आयोजन वार्तालाप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अॅडव्हांटेज विदर्भमधील शैक्षणिक सत्रात ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, स्टार्टअप सत्रात मामाअर्थचे सीईओ वरुण अलग व गझल अलग, जेम्स अॅण्ड ज्वेलरी क्षेत्रातील चर्चेत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टीक कौन्सिलचे साईराम मेहरा, झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन, टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरमानी, एएमटीझेडचे डॉ. जितेंद्र शर्मा, चितळे बंधू उद्योगाचे इंद्रनील चितळे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. यावेळी स्टार्टअप सेक्टरचे संयोजक डॉ. शशिकांत चौधरी, जेम्स अॅण्ड ज्वेलरी क्षेत्राचे संयोजक राजेश रोकडे, दुष्यंत देशपांडे आदींनी त्यांच्या सेक्टरच्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
दुपारच्या सत्रात ‘इन्व्हेस्टर मीट’ पार पडली. यात असोसिएशन फॉर अॅडव्हांटेज विदर्भ (एड) चे उपाध्यक्ष गिरधारी मंत्री यांनी उपस्थित गुंतवणूकदारांशी संवाद साधला. अॅडव्हांटेज विदर्भ मागची भूमिका विशद करताना त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे युवा पिढीलाही सहभागी करावे, असे आवाहन केले.