नागपूर: मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काम झाल्यानंतर तातडीने खड्डे बुजवून रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी कोणाची, नागरिकांना काय उत्तरे द्यायची, अशा प्रश्नांवर नियंत्रण कुणाचे, असे अनेक प्रश्न आहेत. यासाठी तातडीने मनपा आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांची एक समन्वय समिती तयार करा, असे निर्देश मनपाच्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले.
मनपा सभागृहात नगरसेवकांनी विचारलेल्या आणि स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता. १८) समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. बैठकीला सभापती संजय बंगाले यांच्यासह उपसभापती अभय गोटेकर, समितीच्या सदस्य पल्लवी श्यामकुळे, सुषमा चौधरी, शेख मोहम्मद जमाल मो. इब्राहीम, नगरसेवक किशोर जिचकार, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, नगररचना सहायक संचालक सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कुकरेजा, शहर अभियंता मनोज तालेवार, विकास अभियंता सतीश नेरळ, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका सीमा क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कामामुळे रहदारीस अडथळा आणि सुरक्षेच्या संदर्भात काय उपाययोजना आहेत, यावर विचारलेल्या प्रश्नासंदर्भात झालेल्या चर्चेअंती सभापती संजय बंगाले यांनी समन्वय समिती निर्माण करण्याचे निर्देश दिले.
यासोबतच स्मार्ट सिटी अंतर्गत मनपा क्षेत्रात वेगवेगळ्या कंपनीअंतर्गत करण्यात आलेले खोदकाम, अपूर्ण कामे आणि त्यामुळे मनपाला होणारा आर्थिक भुर्दंड यासंदर्भात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांची जी माहिती समितीला हवी आहे ती माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पातील अधिकारीच देऊ शकतात. स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात मनपासोबत झालेला नेमका करार काय, ज्या प्रभागात कार्य सुरू आहे, त्या प्रभागातील नगरसेवकांना त्याबाबत माहिती दिली जाते का, या आणि अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातील आणि प्रकल्पाशी संबंधित व्यक्तींची पुढील दहा दिवसांत स्वतंत्र बैठक बोलविण्याचे निर्देशही सभापती संजय बंगाले यांनी दिले.
नगरसेवक किशोर जिचकार यांनी रहाटे कॉलनी चौकात मोकळ्या जागेवर राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासंदर्भात चर्चा घडवून आणली. चर्चेअंती जी जागा सुचविण्यात आली आहे, ती कोणाच्या मालकीची आहे, हे तपासून त्यांचेकडून नाहरकत घेण्यात यावी आणि पुढील बैठकीत यावर चर्चा करावी, असे निर्देश सभापती श्री. बंगाले यांनी दिले. मस्कासाथ येथील सिव्हर लाईनसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर प्रकल्प विभाग आणि झोन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यावर एकत्र बसून आयुक्तांच्या निर्देशानुसार अभ्यास करावा आणि तातडीने उपाययोजना करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.