नागपूर : राष्ट्रपतीपदावर रुजू झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी प्रथमच नागपुरात आगमन होणार आहे. आज त्यांचा येथील राजभवनात मुक्काम असून ५ व ६ जुलैला त्यांचे गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आहेत.
४ जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती ५जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम झाल्यानतंर त्या पुन्हा नागपुरात दाखल होणार आहे.
त्याच दिवशी दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन करतील. तसेच कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ६ जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे रवाना होणार आहे.