Published On : Thu, Sep 21st, 2017

राष्ट्रपती यांच्या हस्ते २२ ला कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रेशीमबाग येथे निर्मित वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले आणि नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजता राष्ट्रपती मा. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव राहतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी,जलस्त्रोत, नदी विकास व गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रसिकांसाठी पद्‌मश्री पद्‌मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाची भेट
कविवर्य सुरेश भट सभागृह लोकार्पण सोहळ्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रसिकांना पहिलावहिला सांस्कृतिक नजराणा गायिका पद्‌मश्री पद्‌मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाच्या रूपाने मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर सायंकाळी ७ वाजता ‘केव्हा तरी पहाटे…’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या काव्य आणि गझल गायनाचा तसेच त्यांच्या खास पत्रांचा स्मृतिगंध गायिका पद्‌मजा फेणाणी-जोगळेकर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडतील. सदर कार्यक्रमासाठी समोरच्या रांगेतील १०० खुर्च्या राखीव राहतील. नागपूरकर रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.

रेशीमबाग मैदानावर थेट प्रक्षेपण
कार्यक्रमस्थळ असलेल्या सभागृहाची आसन क्षमता दोन हजार असल्याने अनेक नागरिकांना सभागृह उद्घाटनाचे वेळी आत उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना मा. राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचा लोकार्पण सोहळा अनुभवता यावा यासाठी रेशीमबाग मैदानावर एलईडीद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे तीन हजार नागरिकांना एकाच वेळी हा सोहळा अनुभवता येणार आहे. या व्यतिरिक्त नागपूर शहरातील चौकाचौकात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या व्हिङीओ स्क्रीनवरही (व्हीएमएस) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

फेसबुक लाईव्ह
नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरही लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. यामुळे नागपूरसह देशभरातील लोकांना हा सोहळा ‘लाईव्ह’ अनुभवता येणार आहे. फेसबुक लॉग इन करून @nmcngp अथवा Nagpur Municipal Corporation या अधिकृत पेजवर हा सोहळा बघता येईल. रेशीमबाग मैदानावरील थेट प्रक्षेपण, स्मार्ट सिटी स्क्रीनवरील थेट प्रक्षेपण आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागपूरकरांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.

कविवर्य सुरेश भट सभागृह : वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
नागपूर शहरातील मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले कविवर्य सुरेश भट सभागृह वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. १९८८ प्रेक्षकक्षमता असलेले हे सांस्कृतिक सभागृह महाराष्ट्रातील मनपाच्या मालकीचे सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असलेले सभागृह आहे. दिवंगत कवी सुरेश भट हे नागपूरचा गौरव आहे. त्यांच्या नावाने तयार झालेल्या या सभागृहाच्या रूपाने त्यांच्या स्मृति चिरकाल राहणार आहेत.

सुमारे ७५ कोटी खर्चून तयार झालेल्या सभागृहाचे भूखंड क्षेत्रफळ १२२१५.९५ चौ.मी. इतके आहे.त्यापैकी ९७९४.०२ इतक्या चौ.मी. क्षेत्रफळावर सभागृहाचे बांधकाम आहे. इमारतीची उंची ३० मीटर आहे. सभागृह परिसरात तळघर व तळमजल्यावर सुमारे २०० कार, ६०० स्कूटर आणि ६०० सायकल इतकी मोठी वाहनतळ व्यवस्था आहे. व्ही.आय.पीं.साठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे.

१९८८ प्रेक्षक क्षमता असलेल्या या प्रेक्षागृहात आयोजकांच्या सोयीनुसार कमीअधिक आसन व्यवस्था ठेवता येईल. कमीत कमी १३०० आसनक्षमता, १५७८ आणि १९८८ अशी आसनव्यवस्था ठेवता येईल.विशेष म्हणजे दिव्यांगांना स्वतंत्र जागा सभागृहात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सभागृहाती भव्य रंगमंच हे सभागृहाचे आकर्षण आहे. २५ मी. बाय १५ मी. असा एकूण ३७५ चौ.मी.क्षेत्रफळाचा रंगमंच लक्ष वेधून घेतो. इतकीच जागा बॅक स्टेजला आहे. रंगमंचाच्या बाजूला आठ ग्रीन रुम्स आणि दोन व्ही.आय.पी. रुम्स आहेत.

तळघरापासून ते तिसऱ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी प्रत्येकी २० व्यक्ती क्षमतेच्या दोन लिफ्ट आहेत.सभागृहाचा दर्शनी हॉल १२.१५ मीटर उंच व ३६.५० बाय ४१.१५ मी. आकाराचा आहे. संपूर्ण सभागृह आणि इमारत वातानुकुलित आहे. सभागृहात BOSE या जगविख्यात कंपनीची ध्वनियंत्रणा बसविण्यात आलेली आहे. सभागृहातील रंगमंचावरील प्रकाशव्यवस्था स्वयंचलित असून CANARA या नामांकित कंपनीद्वारे उभारण्यात आली आहे. सभागृह व परिसरात सर्वत्र एलईडी दिवे लावण्यात आलेले आहेत.

प्रत्येक मजल्यावर स्त्री-पुरुषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यावर ॲक्वा गार्डसह वॉटर कुलरचीही व्यवस्था उपलब्ध आहे.

विजेसाठी ८०० के.व्ही. क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. याशिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून २५० केव्हीए क्षमतेचे दोन जनरेटर संच उपलब्ध आहेत. सभागृहाच्या तळमजल्यावर उपाहारगृहाकरिता १४८५ चौ.मी. जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक मजल्यावर कॅफेटेरियाची व्यवस्था आहे.सभागृह परिसराचे सौंदर्य खुलविण्यासाठी ५०० चौ.मी. ची आकर्षक लॅण्डस्केपींग तयार करण्यात आलेली आहे. लॅन्डस्केपचा भाग वगळून ५२०० चौ.मी. क्षेत्रामध्ये सीमेंट ब्लॉक पेव्हींग करण्यात आले आहे. श्री.अशोक मोखा हे या प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ असून वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ही वास्तू ओळखली जाणार आहे.

अपारंपरिक ऊर्जेचा होणार वापर
सभागृह व परिसरातील विद्युत वापराकरिता परंपरागत विद्युत व्यवस्थेचा वापर कमी व्हावा याकरिता सभागृहाच्या छतावर ७७० सोलर पॅनल उभारून २०० केव्हीए पीक (Peak) क्षमता असलेले अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे साधारणत: दर दिवशी ५० किलोवॅट ऊर्जा सोलर सिस्टीमद्वारे वापरून उर्वरीत वीज वितरण कंपनीच्या ग्रीड मध्ये नेट मीटरींगद्वारे उपलब्ध होईल. त्यामुळे सभागृहाचा विद्युत खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेवक निशांत गांधी, वास्तुविशारद अशोक मोखा उपस्थित होते.

Advertisement