मुंबई: राष्ट्रीय ललित कला अकादमीचे नूतन अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
श्री. पाचारणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय ललित कला अकादमी होण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली.
राष्ट्रीय ललित कला अकादमी ही विविध शिल्पे, चित्रकला यावर नियंत्रण करण्याचे काम करते. श्री. पाचारणे हे प्रसिद्ध शिल्पकार आहेत. त्यांनी अंदमानाची स्वातंत्र्य-ज्योत, शाहू महाराजांचा पुतळा, सावरकरांचा बोरिवलीतला पुतळा, दहिसरमधला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, ‘मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ’ अशी अनेक शिल्पे साकारली. त्यांना 1985 मध्ये राष्ट्रीय ललित कला पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आठ पुतळे महाराष्ट्रात आहेत तर लखनौ विद्यापीठात 13 फुटी शिवपुतळा आहे. याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतल्याने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 7 मे 2018 रोजी त्यांची राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, रघुनाथ कुलकर्णी उपस्थित होते.