नागपूर: राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करुन देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा देणारी एचव्हीडीएस योजना व विद्युत वाहनकरीता उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन अशा तीन अभिनव योजनांचे उद्घाटन मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी १६ आक्टोबर-२०१८ ला मुंबईत, मंत्रालयातील सभागृहात होणार आहे.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी १२.००वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या तिन्ही योजनांचे उद्घाटन होणार असून या प्रसंगी महसूल मंत्री मा. ना. श्री चंद्रकांतदादा पाटील, वित्त आणि नियोजन मंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा राज्यमंत्री मा. ना. श्री मदन येरावार प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मा. मुख्य सचिव श्री. डी.के. जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांना सध्या दिवसा आठ तास व रात्री दहा तास अशा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येतो. परंतू शेतकऱ्यांना दिवसाही अधिक प्रमाणात वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सौरऊर्जा देण्यात येणार असून त्यामुळे राज्यातील सुमारे ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांना दिवसाही पुरेशी वीज मिळणार आहे.
शेतकऱ्यांना योग्य दाबाने व अखंडीत वीजपुरवठा मिळावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजना महावितरणकडून राबविण्यात येत आहे. या योजनेत एक किंवा दोन कृषीपंपासाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यात रोहित्राबद्दल स्वामीत्वाची भावना निर्माण होऊन रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण घटेल, वीज अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ राज्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना होणार आहे.
वाहनांमुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र व राज्यसरकारने विद्युत वाहनांना मोठे प्रोत्साहन दिले आहे. या धोरणाला मोठा पाठिंबा देण्यासाठी महावितरणच्या वतीने राज्यात ५०० विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास सुरूवात झाली आहे. याही योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यंाच्या हस्ते होणार आहे.