Published On : Fri, Feb 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

बर्ड फ्ल्यू संदर्भात मनपाद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना

बाधित भागात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना

नागपूर : नागपूर शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील तीन पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यू मुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारे परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्ल्यू केवळ पक्ष्यांना होणारा आजार आहे मात्र त्यापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील तीन पाळीव पक्ष्यांचा मृत्यू झाला. या पक्ष्यांचे नमूने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले असता त्याचा अहवाल बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यावर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. मृत पक्ष्यांच्या थेट संपर्कात असलेल्या कुटुंबातील सदस्यांची मनपाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व व्यक्तींचे आरोग्य उत्तम आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाद्वारे त्यांना औषधे सुरु करण्यात आली आहेत. मृत पक्ष्यांच्या संपर्कातील पक्ष्यांवर ‘कलिंग’ प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर देखील प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.

Gold Rate
Friday 07 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील ताजबाग यासिन प्लॉट परिसरातील मृत पक्ष्यांच्या संपर्कातील ३०५४ पक्ष्यांवर ‘कलिंग’ प्रक्रिया राबविण्यात आली. याशिवाय १८० अंडी आणि १००० किलो खाद्य नष्ट करण्यात आले. बर्ड फ्ल्यू हा आजार केवळ पक्ष्यांमध्येच आढळून येत असतो. मात्र सर्तकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे बाधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने इन्फ्ल्युएन्झा सदृश्य रुग्णांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा नमूने गोळा करण्यात येत आहेत. तसेच सर्व खाजगी रुग्णालय व वैद्यकीय व्यवसायिकांना त्यांच्या आरोग्य संस्थेतील ‘आयएलआय’ व ‘सारी’ रुग्णांची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

बर्ड फ्ल्यू हा आजार भारतात आजपर्यंत कोणत्याही मनुष्यामध्ये आढळून आलेला नाही. मात्र जागतिक स्तरावर तुरळक प्रकरणांची नोंद झालेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

अशी घ्या काळजी

हे करा

१. पक्ष्यांमधील स्त्रावासोबत संपर्क टाळा.

२. पक्षी, कोंबड्या यांचे पिजंरे आणि ज्या भांड्यामध्ये त्यांना रोज अन्न दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जन्ट पावडर ने धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.

३. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करु नका.

४. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने हात वारंवार धुवा. व्यक्तीगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा.

५. कच्चे चिकन/चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा.

६. पूर्ण शिजविलेल्या (१०० डिग्री सेल्सीअस) मांसाचाच अन्नात वापर करावा.

७. आपल्या गल्लीत अथवा परिसरात तलाव असेल आणि त्या तलावात पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी वन विभाग/ पशुसंवर्धन विभागास कळविण्यात यावे.

हे करु नका

१. कच्चे चिकन / कच्ची अंडी खाऊ नका.

२. अर्धवट शिजलेले चिकन/पक्षी, अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.

३. आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका.

४. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नका.

Advertisement