मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर मोदींनी सभांचा धडाकाच लावला असून आज ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा मुंबईत आज रोड-शो होणार आहे.
तसेच त्यांची नाशिकमध्ये सभा आहे. २० मे रोजी कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सध्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या प्रचार सभा सुरु आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथे दुपारी होणाऱ्या सभेसाठी खास जलरोधक मंडपाची उभारणी करण्यात आली.
पावसामुळे सभेत व्यत्यय येऊ नये म्हणून आवारात जलरोधक तंबुची उभारणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कांद्याचे लिलाव होतात, तिथे ही सभा होत आहे. दिंडोरीसह अनेक मतदार संघात कांदा निर्यातबंदी प्रचारात कळीचा मुद्दा ठरला आहे.
सरकारने अलीकडेच सशर्त निर्यात खुली केली आहे. सभेत पंतप्रधान कांदा विषयावर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.