Published On : Thu, Jan 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

दुर्गम, नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र विविध स्तरांवर प्रयत्नशील

मुंबई/गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध विकासकामांची सुरूवात करतानाच सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित रहावी यासाठी आपला संकल्प जाहीर केला. गडचिरोली यापुढे महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा राहणार नसून तो पहिला जिल्हा ठरण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच, याठिकाणी सुरू असलेल्या औद्योगिकीकरणामुळे इथल्या नागरिकांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा मिळतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य शासनाने घेतलेला पुढाकार आणि त्यास मिळत असलेल्या नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी गडचिरोली आणि परिसरातील नागरिकांचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र शासन राबवित असलेले विविध उपक्रम, योजना, अभियान यामुळे राज्याच्या प्रगतीचा मार्ग आणखी प्रशस्त होईल, असा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर व्यक्त केला आहे.


प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करण्यासह
नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळेच गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर नमूद केले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करून आदिवासी बांधवांचे जल, जमीन आणि जंगल हे हक्क अबाधित ठेवत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा या बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला. या बसमधून त्यांनी प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे श्री. फडणवीस यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे जवानांशी आणि ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. गडचिरोली जिल्ह्याची ही विकासयात्रा यापुढेही सुरू राहील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी येथील नागरिकांना दिला.

Advertisement