महापौर दयाशंकर तिवारी यांनी घरी जाऊन केले अभिनंदन
नागपूर : नागपुरातील श्रीनभ मौजेश अग्रवाल यांना किशोर वयात संशोधन क्षेत्रात अभुतपूर्व कामगिरीबद्दल सोमवारी (ता. २४) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी श्रीनभ मौजेश अग्रवालच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले.
यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मनपाच्या आरोग्य समितीचे उपसभापती विक्रम ग्वालबंशी, नगरसेवक प्रमोद कौरती यांच्यासह श्रीनभ अग्रवालच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत किशोरांना दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यावर्षी कोरोना काळात एकाच वेळी सन २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
श्रीनभला सन २०२०-२१ साठी हा पुरस्कार मिळाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून श्रीनभला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.