नवी दिल्ली : येथील पुसा परिसरात आयोजित ‘कृषी उन्नती मेळावा-२०१८’ मध्ये आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटद्वारे कोल्हापूर येथील सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे कोनशिला अनावरण करण्यात आले.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने पुसा परिसरात दिनांक १६ ते १८ मार्च २०१८ दरम्यान कृषी उन्नती या राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचा आज दुसरा दिवस असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मेळाव्यास भेट दिली. यावेळी त्यांनी येथील विविध दालनाला भेट देवून माहिती घेतली. तसेच त्यांनी देशभरातील २५ कृषी विज्ञान केंद्राचे रिमोटद्वारे कोनशिला अनावरण केले. यात महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचा समावेश आहे.
सिद्धगिरी मठाच्यावतीने संतोष पाटील, उदय सावंत, अमित हुक्केरीकर, तानाजी निकम, उदयसिंह पाटील यावेळी उपस्थित होते. प. पु. काढी सिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या सिद्धगिरी मठाचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून केंद्र शासनाने येथे कृषी विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. आज प्रधानमंत्री यांनी याचे कोनशिला अनावरण केले.
यावेळी मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी उपस्थित देशभरातील शेतकरी व वैज्ञानिकांना संबोधित केले. यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह, विभागाचे राज्यमंत्री, विविध राज्याचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.