नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशाला संपूर्ण जगात मानाचे स्थान मिळवून दिले. देशाला विश्वगुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेल्या सहा वर्षांपासून यशस्वी पंतप्रधान म्हणून ते काम करीत आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस जल्लोषात फटाके फोडून नव्हे, तर सेवा सप्ताहात सेवा कार्य करून साजरा करण्याची योजना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली असल्याची माहिती आज माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
श्री बावनकुळे म्हणाले, सेवा सप्ताहात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान, रक्तदान करण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगांना, आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मदत करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सेवाकार्य करणार आहेत. ज्याप्रमाणे कोरोनाच्या लढ्यात काम केले आहे, त्याप्रमाणे या सप्ताहात कार्यकर्ते काम करतील. १४ ते २० सप्टेंबर या काळात प्रत्येक मतदान केंद्रावर गावागावांमध्ये सेवाकार्य होणार आहे. १७ सप्टेबरला ६.४५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील जितेंद्रनाथ महाराजांच्या ओजस्वी वाणीतून मोदींच्या जीवनचरित्रावर आभासी रॅली आयोजित केली आहे. यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर लिंकच्या माध्यमातून लोकं जोडले जाणार आहे.
मोदींनी केलेले कार्य समाजातील प्रत्येक घटकासमोर ठेवण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून केला जाणार आहे. २५ सप्टेबरला दिनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे. सर्व बूथ आणि मतदान केंद्रांवर काम करणारे कार्यकर्ते आपल्या घरी आणि कार्यालयांत ही जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रातले हजारो कार्यकर्ते आपआपल्या घरांवर आणि कार्यालयांवर भाजपचे झेंडे फडकवणार आहेत. २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधीजींच्या जयंती दिवसापर्यंत हा सेवासप्ताह, आत्मनिर्भर भारताचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचं स्वप्न बघितलं आहे.
कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी त्यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केवळ जाहिरच केले नाही, तर केंद्रातल्या, राज्यातल्या प्रत्येक योजनेच्या माध्यमातून उद्योगपतींपासून तर लहान व्यावसायिकांपर्यंत आणि शेतकरी, शेतमजुरांपर्यंत छोट्या छोट्या दुकानदारापर्यंत या पॅकेजच्या माध्यमातून भारताला मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी उचललेले हे मोठे पाऊल आहे. यामध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत आत्मनिर्भर योजनेचं पॅकेज पोहोचलं नसेल. तर तत्काळ वेबीनार घेऊन पॅकेज लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आत्मनिर्भर भारतची संकल्पना आणि योजना समजावून सांगण्यात येणार आहे, असे श्री बावनकुळे म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला या सेवा सप्ताहात सर्वांनी सहकार्य करावे आणि मजबूत भारताचं स्वप्न साकार करण्याकरिता साथ द्यावी, असे आवाहन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.