Published On : Wed, Sep 13th, 2017

स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नागपूरची ओळख जगभरात करून देणारा सोहळा आहे. या सोहळ्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांची योग्य व्यवस्था करण्यासंदर्भात तत्पर राहावे. दीक्षाभूमी परिसराची स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या. कुठलीही अनुचित घटना होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या व्यवस्थेसंदर्भात आढावा घेण्यासाठी नागपूर महानगर पालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेता संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक मनोज सांगोळे, अतिरिक्त आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्विन मुदगल आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून दीक्षाभूमीवरील तयारीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी आय.टी.आय., जेल परिसर, माता कचेरी, दीक्षाभूमी यासह इतर ठिकाणी ७१० शौचालये, ७० स्नानगृहांची व्यवस्था करण्यात येत आहे. आयटीआय येथे सुमारे सात हजार चौरस फुटाचा पेंडाल टाकण्यात येत असून तेथे भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. आरोग्य विभागाची टीम २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत २४ तास नागरिकांच्या सेवेत तत्पर असेल.

२४ तास पाण्याची व्यवस्था करण्यासाठी काही ठिकाणी सुमारे २२० तात्पुरते नळ बसविण्यात येणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी भोजनदान आहे तेथे आणि प्याऊसाठी टँकरने पाणी पुरविण्यात येणार आहे. काही ठिकाणी नळ असलेल्या पीव्हीसीच्या टाक्यात उभारण्यात येणार आहेत. दीक्षाभूमीपर्यंत येण्यासाठी नागरिकांनी मनपाची ‘आपली बस’ सेवा देणार आहेत. दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस अशा सुमारे ५० ‘आपली बस’ भाविकांच्या सेवेत राहणार आहेत. दीक्षाभूमी परिसरात पूरक प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे २२५ ते २५० फ्लड लाईट, १० जनरेटर आणि वेळोवेळी पोलिस विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचना भाविकांपर्यंत पोहोचण्यासाठी साऊंडची व्यवस्था प्रकाश विभागातर्फे करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीची व्यवस्था यापूर्वीच झालेली आहे. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत बुजविण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशमन विभाग पोलिसांच्या सहकार्याने आपत्ती निवारण कक्ष उभारणार आहे.

पोर्टेबल फायर एक्स्टिंग्युशर आणि व्हॉलेंटियरसुद्धा ठिकठिकाणी कार्यरत राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (वाहतूक) डी.डी. जांभुळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (हॉटमिक्स प्लान्ट) राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, विकास अभियंता सतीश नेरळ, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.

स्वच्छतेची काळजी घ्या : संदीप जाधव

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी तयार करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपातील शौचालयातील मलब्याची कार्यक्रमानंतर तातडीने विल्हेवाट लावण्याची सूचना सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. पाऊस येण्याची शक्यता लक्षात घेता शाळा, खासगी जागा, शासकीय जागा, समाजभवन आदी पर्यायी जागांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

रस्ते तातडीने खुले करावे : आयुक्त अश्विन मुदगल

दीक्षाभूमीकडे येणाऱ्या सेंट्रल बाजार रोडवरील फुटपाथचे काम, महाराजबागकडून कल्पना बिल्डिंगकडून येणाऱ्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करून तातडीने हे रस्ते दुहेरी वाहतुकीसाठी खुले करावे. रहाटे कॉलनी ते अजनी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात मेट्रोला पत्र देऊन तातडीने त्याचे सपाटीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन शासकीय इमारती, मनपाच्या आणि खासगी शाळांची माहिती घेऊन त्या ताब्यात घेण्याचे निर्देशही त्यांनी सहायक आयुक्तांना दिले. अतिरिक्त मोबाईल शौचालय, प्रत्येक दिवशी परिसराची स्वच्छता होईल त्याची काळजी, आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Advertisement
Advertisement