Published On : Sat, Feb 24th, 2018

बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: पूर्व विदर्भातील महिला बचतगटाने तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासोबतच उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला शासन प्राधान्य देत आहे. स्वयंसिद्धांच्या उपक्रमास इतर विभागांनीही प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात स्वयंसिद्धा या नागपूर विभागीय प्रदर्शनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांसोबतच संवाद साधला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, भंडाऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार सुर्यवंशी, नागपूरच्या डॉ.कादंबरी बलकवडे, प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर आदी यावेळी उपस्थित होते.
स्वयंसिद्धा या महिला बचत गटाच्या माध्यमातून नागपूर विभागातील 350 महिलांनी एकत्र येऊन विविध उत्पादने व खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. पूर्व विदर्भातील 171 महिला बचत गटाचे 126 स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन भंडारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील अंबाडीचे सरबत हे आकर्षण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला बचत गटाच्या सदस्यांनी तयार केलेल्या सरबताची चव घेतली. तसेच ग्रामीण भागातील औषधीद्रव्य असलेल्या विविध उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

Gold Rate
08 April 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900/-
Silver / Kg - 90,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिलांनी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तयार केलेल्या विविध वस्तू, कलाकृती तसेच ग्रामीण खाद्यपदार्थाचे विभागीय प्रदर्शन शुक्रवार, दिनांक 23 फेब्रुवारीपासून दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून समूहातून स्वयंसिद्धा अंतर्गत महिलांना बाजारपेठ व जनतेला गावाकडचा माल उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.

समूहातून स्वयंसिद्धा याअंतर्गत दिनांक 23 ते 27 फेब्रुवारीपर्यत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत विविध साहित्य कापड तसेच खाद्यपदार्थ नागरिकांना उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहेत.

या प्रदर्शनामध्ये खाऊ मंडई, भूसार मंडई, सुग्रणीचा संसार, कलादालन, वन भ्रमंती असे पाच विभाग राहणार असून यामध्ये 45 स्टॉल पूर्व विदर्भातील ग्रामीण भागातील सुगरणींनी केलेल्या खाद्यपदार्थांचे राहणार आहेत. यापैकी भंडारा जिल्ह्यातील विविध कलाकुसर सेंद्रीय तांदूळ, रेशीम साड्या, बांबू हस्तकला, लाकडी हस्तकला वस्तू, पितळी व मातीची भांडी हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे.

खाऊ मंडईमध्ये मांडे, पुरणपोळी, भाकरी, शाकाहारी, मांसाहारी जेवण उपलब्ध करून देणार आहेत. या विभागीय प्रदर्शनाच्या माध्यमातून समुहातून स्वयंसिद्धा तसेच महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा या प्रदर्शन आयोजनामागचा उद्देश आहे. गावाचा सुगंध व गावाकडचा माल हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोज सुर्यवंशी यांनी दिली. दिनांक 27 फेब्रुवारीपर्यत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत स्वयंसिद्धा हे विभागीय प्रदर्शन सर्वांना विनामूल्य असून जनतेने महिलांनी तयार केलेल्या वस्तू व विविध ग्रामीण खाद्यपदार्थांच्या दालनाला भेट देऊन पूर्व विदर्भातील ग्रामीण महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी यांनी महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू तसेच पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच प्रदर्शन आयोजनाबाबत माहिती दिली.

Advertisement
Advertisement